सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कुटुंबीयांकडे भ्रष्ट मार्गाने कमावलेली सुमारे सहा कोटी रूपयांची मालमत्ता उघडकीस आली असून याप्रकरणी लोहार यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलाविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनच्या सात कोटी रूपयांच्या ग्लोबल शिक्षक पुरस्काराचे मानकरी असलेले सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील तत्कालीन शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी तीन वर्षे नेमणुकीच्या गैरहजर राहिल्याने तसेच त्यांनी अमिरिकेत संशोधन शिष्यवृत्तीसाठी मागितलेली रजा नाकारल्यामुळे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार हे चर्चेत आले होते. परंतु त्यानंतर थोड्याच दिवसांत लोहार यांना एका शिक्षणसंस्थाचालकाकडून २५ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.

हेही वाचा : मराठा आरक्षण आता निर्णायक टप्प्यावर? शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले…

या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोहार व त्यांच्या कुटुंबीयांनी कमावलेल्या मालमत्तेची खुली चौकशी केली असता दि. १५ नोव्हेंबर १९९३ ते दि. ३१ आॕक्टोंबर २०२२ या निरीक्षण कालावधीत लोहार कुटुंबीयांकडे कायदेशीर ज्ञात मालमत्तेपेक्षा ११२ टक्के जास्त भ्रष्ट व अवैध मार्गाने मिळविलेली मालमत्ता आढळून आली. एकूण पाच कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रूपयांची ही अवैध मालमत्ता आहे. यात शिक्षणाधिकारी किरण लोहार (वय ५०) यांना त्यांच्या पत्नी सुजाता (वय ४४) आणि मुलगा निखिल (वय २५, तिघे रा. आकांक्षा शिक्षक काॅलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी गैरमार्गाने प्रोत्साहन दिले आणि मदत केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त गणेश कुंभार हे पुढील तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur former education officer kiran lohar 6 crore rupees illegal property found ranjitsinh disale guruji css