सोलापूर : दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे व्याकूळ झालेल्या सोलापूर जिल्ह्यात रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने मोठा दिलासा मिळाला असून तळ गाठलेल्या उजनी धरणातही पाणीसाठा वाढण्यास सुरूवात झाली आहे. दुसरीकडे सोलापूरच्या सखल भगात पावसामुळे महापालिका प्रशासनाचे नाले आणि भूमिगत गटारी साफ करण्याचा दावा सपशेल खोटा ठरला असून सुमारे १०० कोटी रूपये खर्च करून अमृत योजनेअंतर्गत तयार झालेल्या भूमिगत गटारीच्या कामांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, शहर व जिल्ह्यात १ जूनपासूनपासून आजतागायत एकूण सरासरी १३६.५ मीटर पाऊस पडला आहे. सोमवारी सकाळी मोजलेल्या २४ तासांत ३३.२ मिमी इतका सरासरी पाऊस झाला असून यात सर्वाधिक ६४ मिमी पाऊस मोहोळ तालुक्यात तर त्यापाठोपाठ मंगळवेढा तालुक्यात ४५.४ मिमी तर सांगोला तालुक्यात ४२.४ मिमी पावसाची नोंद झाल्याने तेथील नदी,ओढे, नाले भरून वाहात आहेत. विशेषतः सांगोला भागात माण, कोरडा, अफ्रुका आदी नद्यांना पाणी आल्यामुळे तेथील शेतकरी सुखावला आहे. उत्तर सोलापुरात ४१ मिमी पाऊस झाला असून शहरातही अवघ्या दीड तासात पावसाने दाणादाण उडाली होती.

हेही वाचा : राज ठाकरेंचं महत्त्वाचं आवाहन! मोदींना शुभेच्छा नाहीत, निकालांचं अभिनंदनही नाही, म्हणाले, “तमाम महाराष्ट्र…”

पंढरपूर (३६.७), अक्कलकोट (३१.९), बार्शी (३१.५), दक्षिण सोलापूर (२८.८), करमाळा (२०.९), माढा (१९.२) व माळशिरस (१३.४) याप्रमाणे पावसाने हजेरी लावली. आतापर्यंत दहा दिवसांत मोहोळमध्ये सर्वाधिक २०६.२ मिमी पाऊस पडला असून त्यानंतर करमाळा (१८४.६), सांगोला (१६२.९), उत्तर सोलापूर (१४५.१), माढा (१३८.३), मंगळवेढा (१३६.५) आणि सांगोला (११३.५) या तालुक्यांमध्ये पावसाची परिस्थिती समाधानकारक आहे. तर अक्कलकोट (८४.१), दक्षिण सोलापूर (९२.५), बार्शी (९२.७) या भागात आणखी पाऊस होण्याची अपेक्षा आहे.

सोलापूर शहरात गेल्या १५ दिवसांपासून सतत पाऊस पडत असताना त्याचा जोर आता वाढला आहे. सोमवारी सायंकाळी पावसाने पून्हा हजेरी लावायला सुरूवात केली होती. काल रविवारी रात्री पावसाचा जोर वाढून अवघ्या दीड तासात सुमारे तीन इंच मूसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सोलापूर महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईच्या कामांचे पितळ उघड पडले. शास्त्रीनगर, कुंभारवेस, महापालिकेचे गणेश पेठ व्यापारसंकुल, रेल्वे लाईन आदी भागातील नाल्यांची सफाई न झाल्यामुळे त्यातील पाणी रस्त्यावर येऊन आसपासच्या घरांमध्ये शिरले होते. मोदीखान्याजवळील रामवाडी रेल्वे पुलाखाली कंबरेपर्यंत पाणी वाढल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. याच भागातील मसीहा चौक, एसटी बस स्थानकाजवळील जय मल्हार चौकासह मातंग वस्ती, मुरारजी पेठेतील निराळे वस्ती, जुळे सोलापूरजवळील कल्याणनगर, होटगी रस्त्यावरील आनंद नगर, पाच्छा पेठेतील राहुल गांधी झौफडपट्टी आदी भागात पावसाचे पाणी शेकडो घरांमध्ये शिरले. याच पाण्याच्या प्रवाहात काही घरात सर्पही आल्यामुळे तेथील रहिवाशांची त्रेधातिरपीट उडाली होती.

हेही वाचा : “विधानसभेला जेवढ्या जागा शिंदे गटाला द्याल…”; जागावाटपाबाबत छगन भुजबळांची नवी मागणी!

शहरातील अनेक रस्त्यांवर गटारी तुंबल्यामुळे गुडघाभर पाणी साचले होते. नवी पेठ, नवी वेस, एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक, हलवाई गल्ली, मंगळवार बाजार, साखर पेठ, सात रस्ता, होटगी रोड, अशोक चौक आदी भागात रस्ते जलमय झाल्यामुळे वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली होती.

उजनी धरणात पाण्याचा विसर्ग

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात यंदा पाणीसाठा झपाट्याने खालावून तळ गाठल्यामुळे गंभीर परिस्थिती ओढवली आहे. मात्र सुदैवाने मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसामुळे उजनी धरणासाठी दिलासादायक चित्र दिसून येते. या धरणात वजा पातळीवर निचांकी ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा खालावला होता. परंतु दोन दिवसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह भीमा खो-यात पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे उजनी धरणात पाण्याचा प्रवाह हळूहळू वाढत चालला आहे. काल रविवारी रात्री दौंडमार्गे उजनी धरणात ६२८६ क्युसेक विसर्गाने उजनी धरणात पाणी मिसळत होते. सोमवारी त्या वाढ होऊन ७९५४ क्युसेक विसर्गाने पाणी धरणात येऊन मिसळत होते. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत धरणात सुमारे टक्के पाणीसाठा वाढला असून वजा ५७.३१ टक्क्यांपर्यंत म्हणजे एकूण ३२.९० टीएमसी पाणीसाठा धरणात होता.