सोलापूर : एका माजी सैनिकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे सात लाख ४० हजार किंमतीचा ऐवज लंपास केला. शहरातील सिव्हिल लाइन्सच्या अनुराधा सोसायटीत हा गुन्हा घडला असून, त्याची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली आहे.

मनोहर वसंत शेळके (वय ६२) यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री शेळके हे आपल्या घरात आतून कडी लावून झोपले होते. पहाटे झोपेतून उठले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्याने घराच्या शयनगृहाचा लोखंडी ग्रीलची खिडकी उघडली आणि खिडकीतून हात घालून लाकडी दरवाज्यास आतून लावलेला कडीकोयंडा काढला. घरातील कपाट उघडून चोरट्याने सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, गंठण, कर्णफुले, रिंगा तसेच मोबाईल संच आणि रोकड असा ऐवज चोरट्याच्या हाती लागला.

सध्याच्या उन्हाळ्यात उष्म्यापासून संरक्षण मिळण्यासाठी शेळके यांनी रात्री झोपताना घरात कूलर यंत्रणा सुरू केली होती. मोठ्या आवाजात घरात चोर शिरल्याचे आणि चोरी करतानाचा आवाज ऐकू आला नाही, असे शेळके यांनी सांगितले.

महिला तलाठ्यासह दोघांना लाच घेताना अटक

शेत जमिनीशी संबंधित प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी एका शेतकऱ्याकडून १७ हजार रुपयांची लाच घेताना महिला तलाठी आणि महसूल सहायकाला सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले. बार्शी येथे ही कारवाई झाली असून, संबंधित तलाठी व महसूल सहायकाविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तलाठी ऐश्वर्या धनाजी शिरामे (नेमणूक सज्जा ताड सौंदणे, बार्शी तहसील कार्यालय) आणि महसूल सहायक रवींद्र आगतराव भड अशी या कारवाईत सापडलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी सुरुवातीला २० हजारांची लाच मागितली होती.

तडजोडीत १७ हजार रुपयांची लाच स्वीकारली गेली. यातील तक्रारदार शेतकरी असून, त्यांच्या पत्नीच्या मालकीच्या असलेल्या शेतजमिनीचे मुलांच्या नावाने वाटप होण्यासाठी महसूल अधिनियमनानुसार ताड सौंदणे येथील तलाठी कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जाच्या अनुषंगाने पाठपुरावा केला असता संबंधित तलाठी ऐश्वर्या शिरामे यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीत १७ हजार रुपये देण्याचे ठरले. या लाचलुचपतीत त्यांचा सहकारी असलेल्या महसूल सहायक रवींद्र भड यांचाही सहभाग दिसून आला. या दोघांना लाचेची रक्कम मागणी करून प्रत्यक्ष स्वीकारली असता पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापुरातील पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्यासह हवालदार अतुल घाडगे, सलीम मुल्ला, पोलीस नाईक स्वामीराव जाधव, महिला पोलीस शिपाई प्रियांका गायकवाड आदींनी ही कारवाई पूर्ण केली.