सोलापूर : दामदुप्पट परतावा देण्याचे आमीष दाखवून कलकम रियल इन्फ्रा (इंडिया) कंपनीकडून सोलापुरात ३६५ ठेवीदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. फसवणुकीची रक्कम एक कोटी ३२ हजार ८५७ रूपयांची असून प्रत्यक्षात त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास फौजदार चावडी पोलीस करीत आहेत.
संगीता राजेंद्र सलगर (वय ४०, रा. उमरगा, जि. धाराशिव) या ठेवीदार महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सोलापुरात कलकम रियल इन्फ्रा (इंडिया) कंपनीचे कार्यालय शालिमार चित्रपटगृहासमोरील शुभराय टाॕवरमध्ये होते. तर मुरारजी पेठेत जुनी मिल आवारातील ई-स्केअर व्यापारसंकुलात कंपनीची शाखा थाटण्यात आली होती. २०१२ पासून कंपनीचे कामकाज आजतागायत सुरू होते. आर. डी ठेव आणि दाम दुप्पट ठेव योजनेच्या माध्यमातून जादा परतावा मिळवून देण्याचे आमीष दाखवून कंपनीने अनेक मध्यमवर्गीय व्यक्तींना जाळ्यात ओढले. संगीता सलगर यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि ओळखीच्या मिळून ३६५ व्यक्तींनी कंपनीत ठेवी ठेवल्या होत्या.
हेही वाचा : आरक्षण मागणीच्या ध्रुवीकरणाचा मराठवाड्यात राजकीय लाभावरून तर्कवितर्क
परंतु काही दिवस परतावा देऊन विश्वास संपादन करून गुंतवणूक वाढविण्यासाठी ठेवीदारांना प्रवृत्त केले. परंतु नंतर परतावा देण्यास टाळाटाळ होऊ लागली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठेवीदारांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार कंपनीच्या संबंधित संचालक मंडळासह विष्णू दळवी, विजय सुपेकर, सुनील रघुनाथ वांद्रे, अरविंद गोविंद वाघमारे, लक्ष्मण चंद्रकांत भोई, ज्ञानेश्वर साठे व इतरांविरूध्द महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण अधिनियमासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. ठेवीदारांना गंडविण्याचा सोलापुरातील हा सलग दुसरा प्रकार आहे.