सोलापूर : शेतात विहीर खोदण्याचे काम करताना क्रेनला जोडलेली बकेटची अचानकपणे कडी तुटली आणि विहिरीत खाली उतरून काम करणाऱ्या एका मजुराच्या अंगावर कोसळली. यात गंभीर जखमी होऊन त्या मजुराचा मृत्यू झाला. माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ चव्हाणवाडी दुपारी ही दुर्घटना घडली.

अनिल भीमराव आगवणे (वय ३५, रा. डॉ. आंबेडकर नगर, पंढरपूर) असे या दुर्घटनेतील मृत मजुराचे नाव आहे. टेंभुर्णी शिवारातील चव्हाणवाडी निखिल मुळे यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्याचे काम हाती घेण्यात आले होते. खोदलेल्या विहिरीतील दगड-माती बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर केला जात होता. क्रेनच्या साह्याने लोखंडी वजनदार बकेट खाली सोडताना अचानकपणे बकेटची कडी तुटली आणि बकेट विहिरीत काम करणाऱ्या अनिल आगवणे याच्या डोक्यावर कोसळली. यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हे काम करीत असताना योग्य दक्षता न घेता या दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याबद्दल क्रेनचालक व मालकाविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Story img Loader