सोलापूर : एका अल्पवयीन मागास मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध जन्मदात्रीनेच साडेतीन लाख रुपयांस विकून एका तरुणाशी लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उजेडात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने मामाच्या मदतीने पोलिसांत धाव घेऊन कैफियत मांडली. त्यानुसार पोलिसांनी पीडितेच्या आईसह नवरा, सासरा व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, अनुसूचित जातीची पीडित मुलगी (वय १५ वर्षे १० महिने) मूळची लातूर येथील राहणारी असून, तिचे वडील रंगकाम करून कुटुंब चालवितात. मागील काही दिवसांपासून आई तिच्या लग्नासाठी स्थळ शोधत होती.

हेही वाचा : Crime News : महाराष्ट्रात चाललंय तरी काय? बदलापूर, मुंबई अकोल्यासह मुलींवर अत्याचाराच्या मन सून्न करणाऱ्या घटना

शेजारच्या महिलेने पीडित मुलीसाठी स्थळ आणले. त्यानुसार पीडित मुलीला घेऊन आई व शेजारच्या महिलेसह अन्य मंडळी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात आली. तेथे घाई गडबडीत मुलीचा साखरपुडा उरकण्यात आला. नंतर तीनच दिवसांनी तिचे लग्नही लावून देण्यात आले. तत्पूर्वी, पीडित मुलीने आताच लग्न करायची इच्छा नसल्याने मामाशी गुपचूप मोबाइलद्वारे संपर्क साधून आपबीती सांगितली. त्याच वेळी आईने पीडित मुलीला फोन करून, मी तुझ्या नवऱ्याकडून पैसे घेऊन तुझे लग्न लावून दिले आहे, असे कळविले. त्यानंतर पीडित मुलीने नवऱ्याला विचारणा केली असता त्याने, तू हलक्या जातीची असल्यामुळे तुझ्या आईला साडेतीन लाख रुपये देऊन मी तुला विकत घेतले आहे. तू तुझ्या लायकीप्रमाणे आमच्याकडे गुपचूप राहा, असा दम भरला. लग्नाच्या रात्री घरात नवऱ्याने पीडित मुलीचा विनयभंग केला.

हेही वाचा : Maharashtra Bandh : ‘उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घ्या’, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवारांचं आवाहन

शेवटी हे लग्न आपल्या इच्छेविरुद्ध झाल्याने पीडित मुलीने सोलापुरातील आपल्या मामाशी संपर्क साधून, त्याच्या मदतीने सोलापूर गाठले आणि पोलिसांत धाव घेतली. आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा फौजदार चावडी पोलिसांनी नोंदवून कुर्डूवाडी पोलीस ठाण्यास वर्ग केला आहे.