सोलापूर : महावितरणमध्ये स्वतः वीजतंत्री (वायरमन) म्हणून सेवेत असताना वीज दुरुस्तीचे काम स्वतः न करता दुसऱ्याच व्यक्तींकडून करून घेणे चांगलेच महागात पडले आहे. यातून घडलेल्या दुर्घटनेत विजेच्या खांबावर चढून वीज दुरुस्तीचे काम करताना विजेचा तीव्र झटका बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. दक्षिण सोलापूर जिल्ह्यातील मुस्ती गावात ही दुर्घटना घडली.

दरम्यान, याप्रकरणी महावितरणच्या संबंधित वीजतंत्रीविरुध्द वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कुमार तानाजी घाडगे (वय २७, रा. मुस्ती) असे या दुर्घटनेत जीव गमावलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचे वडील तानाजी अंबाजी घाडगे (वय ५६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महावितरणच्या संबंधित बेजबाबदार वीजतंत्रीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित वीजतंत्री स्वतः आपल्या सेवेतील कर्तव्य न बजावता दुसऱ्या व्यक्तीकडून वीज दुरुस्तीची कामे करून घेत असे. नेहमीप्रमाणे त्याने मुस्ती ते संगदरी गावच्या रस्त्यावर नादुरुस्त झालेल्या एका डीपीच्या दुरुस्तीसाठी कुमार घाडगे यास बोलावले.

वास्तविक पाहता या जोखमीच्या कामासाठी कुमार यास कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण झाले नव्हते. तरीही त्यास संबंधित जबाबदार वीजतंत्रीने डीपीच्या वीज खांबावर चढविले. परंतु त्यावेळी विजेच्या खांबावर विजेचा प्रवाह बंद असल्याची खात्रीही केली नव्हती. तसेच पुरेशी सुरक्षा उपकरणेही दिली नव्हती. त्यामुळे कुमार घाडगे हा विजेच्या खांबावर चढला असता विजेच्या प्रवाहाचा तीव्र झटका बसला आणि त्यातच त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ही दुर्घटना घडताच संबंधित वीजतंत्री पळून गेला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.