सोलापूर : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयीची सार्वत्रिक उत्सुकता वाढली असताना, इकडे सोलापुरात इच्छुक नेत्यांना मंत्रिपद मिळण्यासाठी समर्थक देवादिकांना साकडे घालत आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते डॉ. तानाजी सावंत यांना पुन्हा आरोग्य मंत्रिपद मिळण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी पंढरपुरात विठ्ठलाला साकडे घातले आहे. तर, अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना संधी मिळण्यासाठी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांना साकडे घालण्यात आले आहे. दुसरीकडे सोलापूर शहर उत्तरमधून सलग पाचव्यांदा विधानसभेवर निवडून आलेले विजयकुमार देशमुख यांना मंत्रिपदाबरोबर सोलापूरचे पालकमंत्रिपद मिळण्यासाठी विणकर पद्मशाली समाजाच्या कार्यकर्त्यांनी श्री मार्कंडेय देवस्थानात साकडे घातले.
सोलापुरातून मंत्रिपदासाठी प्रामुख्याने भाजपच्या आमदारांची नावे इच्छुक म्हणून समोर येत आहेत. यात विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख, तसेच सचिन कल्याणशेट्टी या तिघांची नावे चर्चेत आहेत. यांपैकी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहकार व पणन मंत्रिपदी राहिलेले आमदार सुभाष देशमुख हे आपल्या लोकमंगल फाउंडेशनमार्फत उद्या, रविवारी होणाऱ्या सामूहिक विवाहसोहळ्याच्या आयोजनात व्यग्र आहेत. मंत्रिपदासंबंधी छेडले असता त्यांनी मौन पाळले.
दुसरीकडे अक्कलकोटचे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार सचिन कल्याणशेट्टी व सोलापूर शहर उत्तरचे सलग पाचव्यांदा निवडून आलेले आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांनी त्यांना मंत्रिपद मिळण्यासाठी देवादिकांना साकडे घातले आहे. कल्याणशेट्टी यांच्या मंत्रिपदासाठी त्यांच्या समर्थकांनी वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात पूजा करून साकडे घातले. दुसरीकडे आमदार विजयकुमार देशमुख यांना पाच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा मंत्रिपदासह सोलापूरचे पालकमंत्रिपद लाभण्यासाठी पद्मशाली समाजाच्या त्यांच्या समर्थकांनी सिद्धेश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिरात साकडे घातले. या वेळी स्वतः आमदार देशमुख यांनी पूजा केली.
शिवसेना शिंदे पक्षाचे नेते व धाराशिव जिल्ह्यातील आमदार डॉ. तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील आहेत. त्यांचे मंत्रिपद धोक्यात असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांनी पंढरपुरात विठ्ठल मंदिरात पूजा करून डॉ. सावंत यांचे मंत्रिपद शाबूत राहण्यासाठी विठ्ठलाला साकडे घातले. मंत्रिपदासाठी देवादिकांच्या नावाने धावा केला जात असताना मंत्रिपदासाठी देव नेमक्या कोणाच्या बाजूने कौल देणार, याचीही उत्सुकता वाढली आहे.