सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत मराठा आरक्षणाबद्दल एक शब्दही न उच्चारता हा प्रश्न बेदखल केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पंतप्रधानांना मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनीही समक्ष उपस्थित राहून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधण्याचे धाडस दाखविले नाही, त्याबद्दल मराठा क्रांती मोर्च्याने संताप व्यक्त केला.
हेही वाचा : “पंतप्रधानांनी शरद पवारांवर ‘ते’ वक्तव्य करूनही अजित पवार शांत बसत असतील, तर…”, रोहित पवारांचं वक्तव्य
चार हुतात्मा पुतळ्यांसमोर एकत्र आलेल्या मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने केली आणि त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या आंदोलनाचे नेतृत्व राम जाधव यांनी केले. आगामी दिवसांत गनिमी काव्याने आंदोलन करून सत्ताधारी नेते व लोकप्रतिनिधींना पळताभुई थोडी करू, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात निशांत साळवे, प्रकाश जाधव, भाऊसाहेब रोडगे, चेतन चौधरी, प्रकाश जाधव, बाळू बाबर, अक्षय पांडे, मारुती सुरवसे, सुदीप पिंपरे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता.