सोलापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची धग अद्यापि कायम असतानाच माढ्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र तथा सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांना मराठा आरक्षण आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी रणजितसिंह शिंदे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्यासह आले होते. शिंदे यांनी एका विकास कामाचे उद्घाटन केले. परंतु नंतर दुसऱ्या विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यासाठी गावात वेशीजवळ आले असताना शिंदे यांना गावातील मराठा आरक्षण आंदोलकांनी अडविले. राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी असताना तुम्ही आलेच कसे, असा सवाल करीत संतप्त तरूणांनी आवाज चढवून वाद घातला.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या संदर्भात काही महिन्यांपूर्वी रणजितसिंह शिंदे यांची एक वादग्रस्त चित्रफित समाज माध्यमांत प्रसारित झाली होती. त्यावेळी मराठा आरक्षण आंदोलकांच्या रोषाला शिंदे कुटुंबीयांना तोंड द्यावे लागले होते. त्यानंतर आमदार बबनराव शिंदे यांनी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलनस्थळी येऊन माफी मागितली होती. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा पंढरपूर तालुक्यात रणजितसिंह शिंदे यांना मराठा आरक्षण आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तुमचे वडील तब्बल ३० वर्षे आमदार आहेत. त्यांनी स्वतःच्या कुटुंबीयांसाठी कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळविले. सकल मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी काय केले ? उलट अन्य समाजाला सवलती द्याव्यात म्हणून शासनाला पत्र कसे दिले ? अशा प्रश्नांची सरबत्ती करीत, आमदार बबनराव शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी ५० हजारांची मदत दिल्याची जाहीर वाच्यता केली असता मराठा आरक्षण आंदोलकांनी लोकवर्गणी गोळा करून आमदार शिंदे यांना मदतीची रक्कम परत पाठवली होती, याची आठवण रणजितसिंह शिंदे यांना गावातून परत पाठविताना करून देण्यात आली.