सोलापूर : पुणे रस्त्यावरील चिंचोळी एमआयडीसीमध्ये एका बंद कारखान्यावर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून सुमारे १६ कोटी रूपये किंमतीचा ८ किलो उत्तेजक एमडी औषधांचा साठा आणि १०० कोटींचा कच्चा माल जप्त केला. याप्रकरणी दोघाजणांना अटक करण्यात आली आहे.
राहुल किसन गवळी आणि अतुल किसन गवळी (रा, सोलापूर) अशी अटक झालेल्या दोघा बंधुंची नावे आहेत. त्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या कारवाईने अमलीपदार्थ उत्पादन क्षेत्रात सोलापूरचे नाव मुंबईसह परदेशाला जोडले गेल्याचे पुन्हा एकदा उजेडात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष क्र. ९ चे प्रमुख दया नायक यांच्या पथकाने चिंचोळी एमआयडीसीतील एका बंद कारखान्याचा पर्दाफाश करून मोठी कारवाई केली. १६ कोटी रूपये किंमतीच्या ८ किलो एमडी ड्रग्जबरोबर त्यासाठी लागणारा कच्चा मालही या कारवाईत सापडला. दोघे गवळी बंधू एमडी ड्रग्ज विक्रीसाठी मुंबईत आले असताना त्यांना पकडण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी चिंचोळी एमआयडीसीत येऊन पुढील कारवाई केली. या कारवाईमुळे स्थानिक पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गवळी बंधुंनी एमडी ड्रग्ज कोणाकोणाला विकले, त्यांचे सूत्रधार कोण, याचा तपास केला जात आहे.

हेही वाचा : मोठी बातमी: शरद पवार गटाचे उर्वरित आमदारही महायुतीत जाणार? गुप्त चर्चेबाबत शिंदे गटाच…

मुंबई आणि थेट विदेशाशी असलेले ड्रग्ज कनेक्शन हे नवीन नाही. यापूर्वी २०१६ साली याच चिंचोळी एमआयडीसीत एव्हान नावाच्या कंपनीत औषध निर्मितीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांचा तब्बल १८ टन एफेड्रिन ड्रग्ज नावाचा साठा ठाणे पोलिसांना सापडला होता. त्याची किंमत सुमारे दोन हजार कोटी होती. त्या प्रकरणात प्रमुख सूत्रधार विकी गोस्वामी आणि सिनेअभिनेत्री ममता कुलकर्णी व इतरांवर कारवाई झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur mumbai crime branch police seized md drugs of rupees 16 crores from a closed factory css
Show comments