सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १९ जानेवारी रोजी सोलापुरात येत असताना त्याच दिवशी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे मुक्कामासाठी येणार आहेत. मोदी यांच्याबरोबर पवार हे एकाच व्यासपीठावर येण्याची अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात पवार यांचे आगमन मोदी हे सोलापुरात येऊन गेल्यानंतर होणार आहे. मोदी यांच्या समवेत नव्हे तर काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत पवार हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मोदी हे अक्कलकोट रस्त्यावर माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या पुढाकाराने रे नगर योजनेअंतर्गत तब्बल ३० हजार असंघटित कामगारांसाठी उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार सदनिका लाभार्थी कामगारांना देण्यासाठी येत आहेत. या गृह प्रकल्पाचे अध्वर्यू नरसय्या आडम हे शरद पवार यांच्याशी १९७८ पासून जुने संबंध बाळगून आहेत.
पंतप्रधान मोदी हे दुपारी सुमारे ४५ मिनिटांच्या कार्यक्रमासाठी येऊन गेल्यानंतर पवार हे सायंकाळी सोलापुरात दाखल होणार आहेत. रात्री त्यांचा मुक्काम राहणार आहे. दुसऱ्या दिवशी (२० जानेवारी) सकाळी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते मंगळवेढा येथे काँग्रेसचे स्थानिक ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे गुरूजी यांच्या अमृत महोत्सव सत्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. यलगुलवार आणि काळुंगे यांच्या दोन्ही सत्कार सोहळ्यास शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे हे एकत्र येणार आहेत.