सोलापूर : प्रफुल्ल पटेल व अजित पवार हे दररोज शरद पवार यांच्या संपर्कात आहोत असा दावा ज्या पध्दतीने करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याशी शरद पवार यांच्यासह आम्हाला सुसंवाद ठेवणे अशक्य आहे. प्रफुल्ल पटेल हे यासंदर्भात जरी दावा करीत असले तरी आमच्या बाजूने तरी त्यात वास्तव नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पटेल यांचा दावा फेटाळून लावला आहे.
रविवारी दुपारी सोलापुरात एका पत्रकार परिषदेत बोलताना खासदार सुळे यांनी विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले. प्रफुल्ल पटेल यांनी आपण स्वतः आणि अजित पवार दररोज शरद पवार यांच्या नित्य संपर्कात असतो, असा दावा केल्याच्या वृत्ताकडे खासदार सुळे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी त्याचा स्वच्छ शब्दांत इन्कार केला.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंकडून ‘मातोश्री’ची दारे तुमच्यासाठी उघडी असतील का? भरत गोगावले म्हणाले…
त्या म्हणाल्या, माझे आणि शरद पवारांचे भ्रमणध्वनी, व्हाॅट्सअॅप, टेलिग्राम वा अन्य कोणत्याही प्रकारच्या माध्यमावरील संभाषणाचे ध्वनिमुद्रण होतच असतील. कारण आजचा जमानाच खराब आहे. आमचे भ्रमणध्वनी वा अन्य कोणत्याही माध्यमातून होणारे संभाषण कोणीही पडताळून पाहू शकतात. आम्ही प्रफुल्ल पटेल यांच्याशी कुठल्याही संपर्कात नाही. आम्ही मधल्या काळात त्यातल्या त्यात सुवर्ण मध्य काढण्यासाठी जुनी नाती जपण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा त्या सगळ्यांनी अगदीच खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करायचे ठरवले, रामकृष्ण हरी, त्यांना माझ्या शुभेच्छाच आहेत, असे खासदार सुळे यांनी स्पष्टीकरण दिले.
हेही वाचा : “छगन भुजबळ वयाने मोठे, अन्यथा…”, शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेनंतर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
प्रफुल्ल पटेल हे स्वतः आणि अजित पवार दररोज शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोलतात, त्यात आमच्या बाजूने तरी वास्तव नाही. पण त्याचे उत्तर आम्ही देऊ शकत नाही. त्याचे उत्तर पटेल यांनाच विचारावे लागेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. प्रफुल्ल पटेल यांच्यापासून ते छगन भुजबळांपर्यंत सर्व शरद पवार यांच्या विषयी ज्या पध्दतीने खालच्या पातळीवर जाऊन बोलतात, ते पाहता या सर्वांना पक्षाची दारे बंद ठेवायची का, या प्रश्नावर सावधपणे भाष्य करताना खासदार सुळे यांनी, त्याबाबतची भूमिका पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून शरद पवार हेच मांडू शकतील, असे स्पष्ट केले.