सोलापूर : मोहोळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांच्या विरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे स्थानिक नेते सोमेश्वर क्षीरसागर यांनी कथित बनावट जातीच्या आधारे तीन पेट्रोल पंप घेतल्याच्या तक्रारीची सीबीआयने चौकशीची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्यावर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोन्ही सत्ताधारी गटांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आमदार यशवंत विठ्ठल माने हे मूळचे इंदापूर तालुक्यातील शेळगावचे रहिवासी असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण इंदापूर व पुण्यात झाले आहे. ते कैकाडी जातीचे आहेत. कैकाडी जात विदर्भात अनुसूचित जात प्रवर्गात मानली जाते. तर उर्वरीत महाराष्ट्रात ही जात विमुक्त जाती संवर्गात समाविष्ट आहे. मात्र आमदार यशवंत माने यांनी स्वतःच्या जातीचा दाखला विदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी असल्याचे नमूद करून अनुसूचित जातीचा दाखला मिळविला, असा सोमेश्वर क्षीरसागर यांचा आरोप आहे.
हेही वाचा..‘ठाणेकरांनी शिंदेशाही संपवायची का?’ विजय शिवतारेंच्या आरोपानंतर अजित पवार गटाचा पलटवार
यशवंत माने यांनी मागील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत मोहोळ राखीव मतदारसंघातून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर यांचा २१ हजार ६९९ मतांनी पराभव केला होता. मात्र त्यानंतर क्षीरसागर यांचे पुत्र सोमेश्वर क्षीरसागर (शिवसेना एकनाथ शिंदे गट) यांनी आमदार यशवंत माने यांच्या जातीच्या कथित बनावट दाखल्यावर आक्षेप घेऊन शासनाकडे तक्रार केली होती. त्यावर निर्णय प्रलंबित असतानाच १७ मे २०२२ रोजी सोमेश्वर क्षीरसागर यांनी, कथित बनावट जातीच्या दाखल्याच्या आधारे केंद्र सरकारकडून तीन पेट्रोल पंप मंजूर करून घेऊन शासनाची फसवणूक केल्याची तक्रार सीबीआयकडे केली होती. त्यावर पाठपुरावा केला असता अखेर सीबीआयने चौकशीची प्रक्रिया हाती घेतल्याची माहिती स्वतः सोमेश्वर क्षीरसागर यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात आमदार यशवंत माने यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.