सोलापूर : एकीकडे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध आणल्यामुळे त्याविरोधात शेतकरी आणि व्यापारीवर्गात असंतोष कायम असताना राज्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर कांदा दाखल झाला. परंतु कांदा लिलाव बंद राहिल्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासन व व्यापाऱ्यांच्या विरोधात सोलापूर-पुणे व हैदराबाद महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. नंतर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले.
हेही वाचा : नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक आक्रमक, लिलाव बंद पाडून कांदा निर्यात बंदीचा निषेध
गेल्या ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला होता. मुळातच कांदा दरात घसरण सुरू असताना काल गुरूवारी ८६ हजार ८०१ क्विंटल इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा दाखल झाला होता. यात कमाल पाच हजार रूपये आणि सर्वसाधारण दर २६०० रूपये मिळाला होता. दरात सुमारे तीनशे रूपयांची घसरण झाली असताना आज शुक्रवारी तेवढ्याच प्रमाणात कांद्याची आवक झाली. परंतु व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास नकार दिला. कांदा लिलाव अचानकपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
हेही वाचा : नवाब मलिकांना झिडकारल्यावर प्रफुल्ल पटेलांवरून भाजपपुढे ‘धर्म’संकट !
सोलापूर जिल्ह्यातील सर्वदूर भागासह पुणे, नगर, सांगली तसेच मराठवाडा आणि शेजारच्या कर्नाटकातील शेतकऱ्यांनी मोठा वाहतूक खर्च करून कांदा आणला होता. परंतु कांदा लिलाव होणार नसल्याची कोणतीही पूर्वसूचना नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली. त्यातूनच संतापलेले शेतकरी रस्त्यावर आले होते.