सोलापूर : चालू ऑक्टोबर महिन्यापासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची भरीव आवक होत असून, मागील १५ दिवसांत अडीच लाख क्विंटलपेक्षा अधिक कांदा दाखल झाला आहे. मात्र, सरासरी दरामध्ये घसरण होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशेचा भाव दिसून येतो.
हंगामात शेतात उगवलेला कांदा कच्चा असतानाच शेजारच्या कर्नाटकातील शेतकऱ्यांनी पाठवलेल्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला तेवढाच चांगला भाव मिळत होता. परंतु आता स्थानिक शेतकऱ्यांकडून कांद्याची आवक वाढू लागल्यामुळे परिणामी सरासरी प्रतिक्विंटल दरात सुमारे दोनशे रुपया पर्यंत घसरण झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा : स्वार्थातून तयार झालेल्या महाविकास आघाडीचा पराभव नक्की; मुख्यमंत्री
३ ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १४ हजार ६६५ क्विंटल इतका कांदा दाखल झाला असता त्यास सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. नंतर ८ ऑक्टोबरपासून सरासरी कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरू झाली आणि सरासरी तीन हजार रुपयांवरून २४०० रुपयांपर्यंत दर खाली गेले. त्या दिवशी ३३ हजार ५३६ क्विंटल कांदा दाखल झाला होता. नंतर सरासरी दरात पुन्हा घसरण होऊन तो दोन हजार रुपयांपर्यंत खालावत गेल्याचे चित्र गेल्या १६ ऑक्टोबर रोजी दिसून आले. दुसरीकडे उच्चांकी दरामध्ये ५१०० रुपयांवरून ५५०० रुपयांपर्यंत चढ उतार होत असल्याचे पाहायला मिळते.
शुक्रवारी बाजार समितीमध्ये कांदा दरात किंचित सुधारणा झाली. दिवसभरात २६ हजार ४० क्विंटल एवढा मर्यादित कांदा दाखल झाला असता त्यास उच्चांकी ५५०० रुपये आणि सरासरी २५०० रुपये याप्रमाणे दर मिळाला.