लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : राज्यात महायुती पुन्हा सत्तेवर आल्याच्या पार्श्वभूमीवर कमकुवत महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये गळती सुरू झाली आहे. इकडे सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील लहान-मोठे नेते शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष किंवा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दाखल होत आहेत. तर, काही जण महायुतीत सोयीप्रमाणे जवळच्या घटक पक्षात प्रवेश करायला इच्छुक असल्याचे सांगितले जाते.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील तरुण नेते सचिन सोनटक्के यांनी स्वतःचे राजकीय बस्तान बसविण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचा अनुभव घेतला आहे. यापूर्वी तेलंगणातील तत्कालीन सत्ताधारी भारत राष्ट्र समिती पक्षाने (बीआरएस) सोलापुरात पाय रोवण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला त्यास यश मिळाले होते. दिवंगत माजी खासदार धर्मण्णा सादूल यांच्यासह भाजपचे दिवंगत माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र तथा भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी अन्य चार माजी नगरसेवकांसह बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. याशिवाय शहराच्या पूर्व भागातील काही निवडक मंडळी बीआरएसमध्ये दाखल झाली होती. पंढरपूरचे भगिरथ भालके यांनीही या पक्षात प्रवेश केला होता.
तसेच, दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाजाचे महत्त्वाकांक्षी तरुण नेते सचिन सोनटक्के यांनीही बीआरएसमध्ये जाऊन स्वतःचे राजकीय भवितव्य आजमावून पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर सर्वांचा भ्रमनिरास झाला. विशेषतः तेलंगणात तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस पक्षाचा साफ धुव्वा उडाल्यानंतर या पक्षाचा विस्तार झटपट खुंटला. सोलापुरातही पक्षाची स्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी बनली.
या पार्श्वभूमीवर सचिन सोनटक्के यांनी काळाची पावले ओळखून बीआरएस पक्षाशी घरोबा यापूर्वीच तोडला असून, आता त्यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोनटक्के हे शिवसैनिक बनले. दक्षिण सोलापुरात आपल्या सोबत ५२ गावांतील आजी-माजी सरपंच असल्याचा दावा सोनटक्के यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षालाही सोलापुरात गळती लागली असून, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार रतिकांत पाटील, दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार, माजी जिल्हाप्रमुख अमर पाटील, साईनाथ अभंगराव आदींनी अलीकडेच शिवसेना शिंदे पक्षात जाणे पसंत केले होते. त्या पाठोपाठ माढा भागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते संजय कोकाटे यांनीही शरद पवार यांची साथ सोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला जवळ केले आहे. दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणखी बरीच मंडळी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचा दावा सचिन सोनटक्के यांनी केला आहे.