सोलापूर : देशाचा सर्वांगीण विकास करताना गोरगरीब जनतेच्या सुखी जीवनाचे स्वप्न पूर्ण होत असल्याबद्दल जनता जनार्दनाकडून मिळणारा आशीर्वाद हेच आपले सर्वात मोठे भांडवल आहे. पूर्वीच्या सरकारकडून केवळ गरिबी हटावाच्या घोषणा व्हायच्या. प्रत्यक्षात गरिबी हटत नव्हती. आपल्या सरकारने केवळ घोषणा न करता ठोस कामातून गरिबी हटवत आहोत, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. भगवान श्रीरामाने दिलेल्या सत्यवचनाच्या शिकवणीतून हजारो गरीब कामगारांना हक्काची घरे देण्याचा संकल्प साकार होताना त्यातून मिळणारा आनंद जास्त वाटतो, अशा भावनापूर्ण शब्दात मोदी यांनी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उभारणीचा सूरही आळवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापूरजवळ कुंभारी येथे माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या प्रमुख पुढाकाराने ३० हजार असंघटित कामगारांना रे नगर योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरांच्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांसह राज्यातील सुमारे ९० हजार घरांचा ताबा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी समारंभपूर्वक देण्यात आला. त्यावेळी उपस्थित सुमारे एक लाख जनसमुदायासमोर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश भैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सांगलीचे खासदार संजय पाटील, भाजपचे आमदार विजय देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते. कामगारांसाठी देशात सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या या पथदर्शी गृहप्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

हेही वाचा : देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते सोलापुरात लोकार्पण, ‘या’ प्रकल्पांचंही केलं भूमिपूजन

या शासकीय समारंभात आपल्या ३८ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या श्रीरामलल्ला मंदिराचा उल्लेख करून त्यादिवशी सायंकाळी प्रत्येकाने आपापल्या घरात रामज्योत प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. याचवेळी उपस्थित समुदायाला प्रभू श्रीरामाच्या नावाने आपापले मोबाइलची बॕटरी प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. तेव्हा एकाचवेळी संपूर्ण सभास्थळ मोबाइल बॅटऱ्यांनी प्रकाशमान झाले. त्यावेळी जय श्रीरामाच्या घोषणांसह मोदी-मोदीच्या ललकारीने संपूर्ण सभास्थळ दुमदुमून गेले. अयोध्येत रामालल्ला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा आपल्या हातून होत असल्याने हे पवित्र कार्य करण्याचे भाग्य लाभले. त्यासाठी श्रध्दाभावनेने आपण महाराष्ट्रातील नाशिकच्या रामभक्तीने प्रेरीत पंचवटीभूमीत अनुष्ठानाला प्रारंभ केल्याचा उल्लेखही मोदी यांनी केला. श्रीरामज्योतीच्या रूपाने गरिबांच्या घरातील अंधार संपविण्याची प्रेरणा मिळून त्यांचे आयुष्य प्रकाशमान व्हावे, अशा शब्दात मोदी यांनी सदिच्छा व्यक्त केली.

यापूर्वी ९ जानेवारी २०१९ रोजी देशात सर्वात मोठ्या ३० हजार असंघटित कामगारांसाठी घरांच्या योजनेचे भूमिपूजन आपण केले होते. नंतर घरांच्या चाव्या देण्यासाठीही आपणच येणार असल्याची हमीही दिली होती. त्याप्रमाणे आज ही हमी पूर्ण केली. ‘मोदी गॅरंटी’ पूर्ण होण्याची ही ‘गॅरंटी’ आहे, असे उद्गारही त्यांनी काढले. मिळालेली घरे ही लाखो गरीब कामगारांची संपत्ती आहे. लाभार्थी कामगारांना पिढ्यानपिढ्या भोगावे आलेले कष्ट, हालअपेष्टा आता त्यांच्या नव्या पिढीला झेलावे लागणार नाहीत, असा विश्वासही मोदी यांनी दिला.

हेही वाचा : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे…”, भर सभेत मोदींच्या समोरच नरसय्या आडम यांनी केला उल्लेख!

राजकारणात दोन विचार करतात. एक विचार लोकांच्या भावना भडकावण्याचा असतो. तर दुसरा विचार गोरगरिबांचे कल्याण साधणे. आपण सामान्यजनांच्या छोट्या-मोठ्या सुखी जीवनाच्या स्वप्नांना आकार देत आहोत. सर्वांनी नेहमी मोठीच स्वप्ने पाहावीत, त्यासाठी आपले सरकार साथ देईल, अशीही ग्वाही पंतप्रधानांनी दिली. पूर्वी गरिबी हटावाच्या घोषणा व्हायच्या. पण गरिबी हटली नाही. आधी रोटी खायेंगे, असेही म्हटले जायचे. परंतु आपले सरकार गरिबांसाठी संपूर्ण समर्पित आहे. पूर्वी घरे आणि शौचालयांअभावी माय भगिनींना अपमानित जीवन जगावे लागत असे. आपल्या सरकारने २५ कोटी जनतेला दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले असून चार कोटी घरे आणि दहा कोटी शौचालये बांधून दिल्याचा दावाही मोदी यांनी केला.

पाच प्रातिनिधिक लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या

३० हजार असंघटित कामगारांच्या घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार घरांचा ताबा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच लाभार्थी कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. सुनीता मुद्यप्पा जगले, लता विजय दासरी, रिझवाना लालमहंमद मकानदार, बाळूबाई सुनील वाघमोडे आणि लता मनोहर आडम अशी या प्रातिनिधिक लाभार्थ्यांची नावे आहेत.

हेही वाचा : ..आणि मोदींचा कंठ दाटून आला, “लहानपणी अशा घरात राहायला मिळालं असतं तर…”; सोलापुरात पंतप्रधान भावूक

मोदी झाले भावूक, क्षणभर रडू कोसळले

रे नगर योजनेच्या घरांच्या हस्तांतरणप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड भावूक झाले होते. रे नगरची घरे जेव्हा मी पाहात होतो, तेव्हा आपल्यालाही लहानपणी राहायला असे एखादे घर मिळाले असते तर..हे वाक्य उच्चारता त्यांचे मन हळवे झाले. गळा दाटून आला. शब्द फुटत नव्हते. त्यांचे डोळे अश्रुंनी डबडबले. काही क्षण बोलू शकले नाहीत. नंतर पुढे काही क्षण ते कातर स्वरांतूनच बोलले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur pm narendra modi said blessings of janta janardan is our biggest capital css