सोलापूर : भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या नावाने कलंकित इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेचे स्वप्न पाहात आहे. काँग्रेसला पुन्हा सत्तेची मलाई खायची आहे. त्यासाठी त्यांची पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याची तयारी आहे. त्यांच्या हाती एवढ्या मोठ्या देशाची सत्ता सोपविल्यास देशात पुन्हा भ्रष्टाचार आणि दहशतवाद होऊन देशाची फाळणी होईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची होम मैदानावर जाहिर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दुपारच्या तळपत्या उन्हात सुमारे ७५ हजारांचा जनसमुदाय या सभेला हजर होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात ‘चारसौ पार’ करून पुन्हा भाजपच्या हाती सत्ता आल्यास देशाचे संविधान बदलण्याची भीती व्यक्त होत असताना त्याबाबत थेट उल्लेख टाळून पंतप्रधान मोदी यांनी दलित, भटके विमुक्त जाती-जमाती, ओबीसी घटकांच्या विकासासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही दिली. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने ६० वर्षात दलित, आदिवासी, ओबीसींचा जेवढा विकास केला, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी विकास मागील दहा वर्षात आपल्या नेतृत्वाखालील सरकारने केल्याचा दावाही त्यांनी केला. विकासापासून वंचित राहिलेल्या या वर्गाला मोफात धान्यासह निवारा, पाणी, वीज, शिक्षण, शौचालय, स्वयंपाक गॕस आदी सुविधा सेवक म्हणून आपण करू शकलो. गोरगरिबांच्या विकासासाठी नीती साफ असेल तर त्याचे दृश्य परिणामही तेवढेच साफ ठरतात, हेच आपण दाखवून दिल्याचा दावा मोदी यांनी केला. मागील दहा वर्षात भाजपने देश चालविताना दलिताला राष्ट्रपतिपदाची संधी दिली. नंतर देशाच्या इतिहासात प्रथमच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनविले. देशात दलित, आदिवासीचे सर्वाधिक आमदार व खासदार भाजपचे आहेत. दलित, आदिवासी आणि ओबीसींबरोबर आपले मनापासून नाते आहे. म्हणूनच मागील दहा वर्षात सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून या वर्गाला आम्ही ताकद दिली. याउलट काँग्रेसची या वर्गाबद्दलची खोटी नियत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबू जगजीवनराम यांच्यासारख्या दलित नेत्यांना काँग्रेसने सदैव अवमानित केले. काँग्रेसने दलित-आदिवासींचा नेहामीच आवाज दाबला आणि विश्वासघात केला, असा आरोप मोदी यांनी केला. आपल्या ३१ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी कर्नाटकात काँग्रेस सरकारने अल्पसंख्याक समाजाला दिलेल्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावर बोट ठेवत, धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने दलित, आदिवासी आणि ओबीसी वर्गाला साथ देण्याची हाक दिली.

हेही वाचा : भाजपात जाणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं सूचक विधान; म्हणाले, “कारखाना वाचवायचा…”

पद्मशाली समाजाचे मीठ खाल्लो

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सोलापूर शहरात बहुसंख्येने राहणा-या आणि भाजपला साथ देणा-या पद्मशाली समाजाशी भावनिक नाते जोडण्याचा प्रयत्न केला. आपल्या आहमदाबादमध्ये राहणा-या पद्मशाली समाजाला आपला नेहमीच संबंध आला. आठवड्यातून किमान एक दिवस तरी पद्मशाली कुटुंबीयांकडे जेवण केलो नाही, असे कधीही झाले नाही. पद्मशाली समाजाचे आपण मीठ खाल्लो असून त्याची जाणीव कायम असल्याचा उल्लेख करून मोदी यांनी सोलापूरच्या पद्माशाली समाजाच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : “आम्ही सुरतला गेल्यावर उद्धव ठाकरे भाजपा नेतृत्वाला फोन करून म्हणाले…”, एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

सुरूवातीला काही वाक्ये मराठीतून बोलताना सोलापूरकरांना मनापासून नमस्कार करतो. जय जय रामकृष्ण हरी, ग्रामदैवत सिध्देश्वर, पंढरपूरचा विठ्ठलचरणी नतमस्तक होतो, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या धरतीचे आशीर्वाद घ्यायला येताना पुन्हा एकदा मोदी सरकारचा विश्वास वाटतो, अशी वाक्ये त्यांनी मराठीतून उध्दृत केली.

हेही वाचा : राष्ट्रवादीतील घराणेशाहीबाबत विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हो बरोबरच आहे, मी आणि अजितदादा…”

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार राम सातपुते यांच्यासह माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद चंदनशिवे, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्रा.ज्योती वाघमारे या मागासवर्गीय समाजातून प्रतिनिधित्व करणा-या नेत्यांची भाषणे झाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur pm narendra modi said if power goes to india alliance then again terrorism corruption division of country css
Show comments