सोलापूर : हिंदू संस्कृतीत धार्मिक पूजापाठासाठी शंखाचा उपयोग शुभ मानला जातो. परंतु, सोलापुरात जिवंत शंख आर्थिक लाभ मिळवून देतो, अशी भुरळ पाडून एका शेतकऱ्याला जिवंत शंख मिळवून देण्याच्या नावाखाली २५ लाख रूपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी एका तथाकथित महाराज आणि महिलेसह पाचजणांविरूद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथे २१ ते २४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान हा प्रकार घडला असून फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव सचिन हरिदास यादव (वय ३६, रा. खिलारवाडी) असे आहे. यादव हे शेतकरी असून संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे शाखा अध्यक्ष आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेघराज अवताडे ऊर्फ बाबा पाटील, सूरज पोपट पारसे ऊर्फ पारसे महाराज (दोघे रा. फळवणी, ता. माळशिरस), अनिल मोरे, सलीम (पूर्ण नाव नाही.) आणि ३० वर्षांची अनोळखी तरूणी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा : यवतमाळ-वाशिममध्ये संजय राठोड विरुद्ध संजय देशमुख ? राठोड म्हणाले, मला उमेदवारी….
सचिन यादव यांना ओम कोरे (रा. लातूर) हे सांगोला तालुक्यातील महूद येथे भेटले. त्यांनी मेघराज अवताडे ऊर्फ बाबा पाटील यांच्याकडे २५ लाख रूपये किंमतीत जिवंत शंख उपलब्ध असल्याची माहिती दिली आणि जिवंत शंख दुसऱ्या व्यक्तीला विकला तर दुप्पट लाभ मिळतो, अशी भुरळही पाडली. त्यानुसार मेघराज अवताडे याच्याशी संपर्क साधून त्यास महूद येथे बोलावून घेतले. मेघराज याने सोबत आणलेला जिवंत शंख सचिन यादव यांना दाखविला. या जिवंत शंखावर दूध ओतले असता त्याच्या खालील बाजूला दही निघत होते. हा जिवंत शंख ५० किलो तांदळाखाली ठेवल्यास तो तांदळाच्या ढिगा-यातून आपोआप बाहेर येतो, अशी खात्री करून देताना हा जिवंत शंख विकत देताना पूजापाठ करावा लागतो, असे मेघराज अवताडे यांनी सांगितले.
हेही वाचा : हातकणंगलेत सत्यजित पाटील सरूडकर यांच्या हाती मशाल
या जिवंत शंखामुळे आर्थिक लाभ मिळतो म्हणून भुरळ पडलेल्या सचिन यादव यांनी मित्र, नातेवाईकांकडून उसनी रक्कम घेऊन आणि बँक कर्ज काढून २५ लाख रूपये गोळा केले आणि ही रक्कम मेघराज अवताडे यास दिली. त्यानंतर जिवंत शंख देण्यापूर्वी त्याची पूजा करावी लागते, अशी सबब पुढे करून सचिन यादव यांना फळवणी गावात पारसे महाराजांकडे नेण्यात आले. तेथे महाराजांच्या सेवेसाठी असलेल्या एका तरूणीने महाराज खूप कडक उपासना करतात. त्यांना पूजेसाठी म्हणून ५० हजार रूपये काढून घेतले. मात्र नंतर तांत्रिक कारणांमुळे जिवंत शंखाची पूजा दोन दिवसांनी मुहूर्तावर करण्याचे ठरले. जिवंत शंख मेघराज अवताडे याच्याच ताब्यात होता. परंतु, नंतर संपर्क करून मेघराज भेटत नव्हता. शेवटी पारसे महाराजांच्या भेटीतून हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा असल्याचे आढळून आले.