सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी आणि चंद्रमौळी सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये चार महिन्यांपूर्वी झालेल्या काही कारवायांमध्ये मेफेड्राॅन या घातक अंमली पदार्थांचा मोठा साठा पकडला गेल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या अंमली पदार्थ उत्पादनासह विक्रीशी संबंधित टोळीच्या म्होरक्यासह दोघांना जेरबंद केले आहे. आतापर्यंत या टोळीच्या एकूण १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये चिंचोळी एमआयडीसी व चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत औषध उत्पादनाशी निगडीत काही बंद रासायनिक कारखान्यांमध्ये मेफेड्राॅन (एमडी) अंमली पदार्थांचे उत्पादन होत असताना प्रथम मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकून मोठी कारवाई केली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांनीही दोनवेळा धाडी टाकून कोट्यवधी रूपये किंमतीचा मेफेड्राॅन आणि कच्चा माल जप्त केला होता. या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनीही सजगता दाखवून सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील देवडी फाट्याजवळ मोटार कार ताब्यात घेऊन त्यातील मेफेड्राॅनचा सुमारे सहा कोटी रूपये किंमतीचा मेफेड्राॅनचा ३०१० किलो साठा हस्तगत केला होता. त्यात दोघाजणांना अटक झाली होती.
हेही वाचा : अजित पवारांच्या पुतण्याची शरद पवारांच्या कार्यालयाला भेट, दीपक केसरकर म्हणाले, “पवार कुटुंबामध्ये…”
पुढे तपासात चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत मेफेड्राॅन अंमली पदार्थ तयार होत असल्याचे स्पष्ट झाले असता तेथेही धाड टाकून कारवाई झाली होती. त्याचे धागेदोरे उत्तर प्रदेश व उत्तर प्रदेशासह महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी वेगवेगळ्या राज्यांतून आतापर्यंत १२ जणांना अटक झाली होती. परंतु या टोळीचा मुख्य सूत्रधार सापडत नव्हता. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम घेताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज निंबाळकर व सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कर्नाटकातील कलबुर्गी येथे सापळा लावण्यात आला. त्यात या टोळीचा मुख्य सूत्रधार फय्याज अहमद रसूल शेख (वय ५२, रा. स्विट सहारा अपार्टमेंट, जी. जी. काॅलेज रोड, वसई, जि. पालघर) यास पकडण्यात आले. त्याचा दुसरा साथीदार रमेश नरसिंह आयथा (वय ४२, रा. मलकजगिरी, हैदराबाद) यास हैदराबादमधून अटक करण्यात आली.
हेही वाचा : सांगली : कुपवाडमध्ये अंमली पदार्थ शोधासाठी पुणे पोलिसांचे छापे
या टोळीचा मुख्य सूत्रधार फय्याज शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरूध्द कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, चेन्नई, पालघर, नाशिक आदी ठिकाणी मिळून १० गुन्हे नोंद असल्याचे पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी सांगितले. शेख याचे शिक्षण जेमतेम दुसरीपर्यंत झाले आहे. मात्र त्याच्याकडे मेफेड्राॅन अंमली पदार्थ तयार करण्याचे तांत्रिक ज्ञान असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहायक फौजदार श्रीकांत गायकवाड, हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, महिला पोलीस शिपाई दीपाली जाधव, अनवर आतार, विनायक घोरपडे, अक्षय डोंगरे, समर्थ गाजरे आदींनी सहभाग घेतला होता. फय्याज शेख व त्याचा साथीदार रमेश आयथा हे दोघेही पोलीस कोठडीत आहेत.
हेही वाचा : महायुतीत लोकसभेच्या कमी जागा मिळाल्यास प्लॅन बी काय? ३२-१२-४ च्या फॉर्म्युल्यावर शिंदे गटाचे खासदार म्हणाले…
अन्य टोळ्यांशी असलेल्या संबंधांची चौकशी
“सोलापुरात मेफेड्राॅन निर्मिती आणि विक्रीशी संबंधित फय्याज शेख याची टोळी सापडली असताना दुसरीकडे नाशिक, पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथेही मेफेड्राॅन उत्पादन करणाऱ्या टोळ्या सापडल्या आहेत. या टोळ्यांचे फय्याज शेख टोळीशी लागेबांधे आहेत काय, याची चौकशी सुरू आहे”, असे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी म्हटले आहे.