सोलापूर : महापुरूषांच्या जयंती-पुण्यतिथीसह अन्य सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली प्रचंड प्रमाणावर डिजिटल फलक उभारून संपूर्ण सोलापूर शहराचे सौंदर्य विद्रुप होत असताना आतापर्यंत महापालिका आणि पोलीस प्रशासन त्याकडे काणाडोळा करीत होते. परंतु नवे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी डिजिटल फलकांच्या विरोधात व्यापक प्रमाणावर कारवाई हाती घेतली आहे. या कारवाईत महापालिका प्रशासनाला निमूटपणे भाग घेणे भाग पडल्याचे दिसून आले. या कारवाईमुळे शहराचा गुदमरलेला श्वास मोकळा होण्यास मदत झाली आहे. त्याबद्दल सामान्य नागरिकांना सुखद दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजेसारख्या ध्वनिप्रदूषणाला आमंत्रण देणारी ध्वनी यंत्रणा वापरण्यास आळा घालण्याच्यादृष्टीने नवे पोलीस आयुक्त राजकुमार यांनी खंबीरपणे पाऊल उचलले आहे. त्याबद्दल नागरिकांमध्ये विशेष समाधान व्यक्त होत आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त हिंमतराव देशभ्रतार, रवींद्र सेनगावकर, अंकुश शिंदे आणि हरीश बैजल यांच्या कार्यकाळात डिजिटल फलकांसह डीजे ध्वनियंत्रणेवर परिणामकारक आळा घालण्यात आला होता. त्यावेळच्या पालिका आयुक्तांनीही तेवढीच कार्यक्षमता दाखविली होती. परंतु गेल्या दीड-दोन वर्षांत तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने आणि विद्यमान पालिका प्रशासक शीतल तेली-उगले यांच्या कार्यकाळात डिजिटल फलकांसह डीजे ध्वनीयंत्रणेला अक्षरशः मोकळे रान मिळाले होते. त्याबद्दल सातत्याने ओरड होऊनसुध्दा प्रशासन ढिम्मच राहिले होते.
या पार्श्वभूमीवर नवे पोलीस आयुक्त एम. राजकुमार हे रुजू झाले असता एका सार्वजनिक उत्सवाच्या मिरवणुकीत प्रचंड प्रमाणावर ध्वनिप्रदूषण करणाऱ्या ध्वनी यंत्रणेचा वापर झाल्याचे दिसून येताच त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित २४ सार्वजनिक मंडळांशी संबंधित ६४ व्यक्तींविरूध्द ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राजकुमार यांच्या कार्यक्षम प्रशासनाचे दृश्य परिणाम दिसून येत आहेत.
इतर उत्सवांप्रमाणे शिवजयंती उत्सवात शहरात बहुसंख्य रस्ते, छोटे-मोठे चौक डिजिटल फलकांनी व्यापून गेले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी डिजिटल फलकांच्या अक्षरशः रांगा लागल्या होत्या. त्याचा फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसत होता. यातून शहराचे एकूणच सौंदर्य बिघडले होते. डिजिटल फलकांवर महापुरूषांपेक्षा स्थानिक तथाकथित नेते व कार्यकर्त्यांच्या छबी दिसत होत्या. यापैकी बहुसंख्य छबी असलेल्या मंडळींच्या नावावर पोलिसांत विविध स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. यातील बऱ्याच जणांवर तडीपारीसह एमपीडीएसारख्या स्थानबध्दतेची कारवाई झाली होती.
या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त राजकुमार यांनी डिजिटल फलकांविरूध्द महापालिका प्रशासनाला झोपेतून जागे करीत व्यापक कारवाई हाती घेतली. दोन-तीन दिवसांत शंभरपेक्षा जास्त डिजिटल फलक हटविण्यात आले असून शिवाय कारवाईचा धसका घेऊन संबंधित मंडळांनी स्वतःहून डिजिटल फलक उतरवून घेतले आहेत. सात रस्ता, डफरीन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क चौक, सरस्वती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुणे चौत्रा नाका, छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर, बाळे, बाळीवेस, अशोक चौक, पाच्छा पेठ आदी भागात पोलीस बंदोबस्तात डिजिटल फलक हटविण्यात आल्यामुळे तेथील चौक व रस्त्यांचा गुदमरलेला श्वास मोकळा झाला आहे. त्याचे स्वागत करताना ही कारवाई सातत्याने व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.