सोलापूर : आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात बारामतीकडे होणारी गांजासारख्या अंमली पदार्थाची तस्करी सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडली. या कारवाईत ४५९ किलो ३४० ग्रॅम गांजा जप्त करून चौघाजणांना अटक करण्यात आली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथे ही कारवाई करण्यात आली. आंध्र प्रदेशातील श्रीकुलम येथून गांजा वाहतूक करणारी मोटार सोलापूरमार्गे बारामतीकडे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कोंडी येथे सापळा लावण्यात आला. यात अशोक लेलॅन्ड पिक अप वाहनातून (एमएच.४२ बीएफ १९२६) ४५९ किलो ३४० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. त्याची बाजारातील किंमत एक कोटी ४६ हजार ९०० रूपये एवढी दर्शविण्यात आली आहे.
हेही वाचा : निवासी डॉक्टर राज्यव्यापी संपावर ठाम, गुरुवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून जाणार संपावर
मोटारचालक अल्ताफ युनूस इनामदार (वय ३८, रा. पिंपळी, ता.बारामती) व जमीर इब्राहीम शेख (वय ३५, रा. सिध्देश्वर गल्ली, बारामती) यांसह अन्य दोघांना अटक झाली असून मुख्य सूत्रधार मानला जाणारा लाला बागवान याचा शोध घेण्यात येत असल्याचे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मोडनिंब येथेही गांजा तस्करी पकडण्यात आली होती. त्यावेळी दोन मोटारींतून १०५ किलो ३८० ग्रॅम गांजासह एकूण ३६ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. हा गांजा ओडिशा येथील गुणपूर येथून अकलूजकडे नेण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.