सोलापूर : डान्सबारमध्ये नृत्यांगनांसोबत बेभान होऊन नृत्य करताना प्राध्यापकाचे छायाचित्र आणि चित्रफित काढून समाज माध्यमावर प्रसारित करण्याची आणि त्याच्या महाविद्यालयास पाठविण्याची धमकी देत दोन लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पाचजणांच्या टोळक्याविरूध्द पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या गुन्ह्यासाठी या टोळक्याने सोलापुरात सात रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाचा वापर केल्याचे दिसून आले.
पीडित प्राध्यापक (वय ३७, मूळ रा. माढा) हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका वरिष्ठ महाविद्यालयात अध्यापन करतात. त्यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अनमोल केवटे, महेश कांबळे, आसीफ शेख, नागेश बिराजदार आणि बंदेनवाज शेख (रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी कोणालाही अटक झाली नाही. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा : छबिना मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने तरूणावर खुनीहल्ला, करमाळ्याजवळील घटना
पीडित प्राध्यापक आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. पीडित प्राध्यापकास या टोळक्याने एका डान्सबारमध्ये नेले. तेथे नृत्यबाला नाचत असताना प्राध्यापक महाशयांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. ते बेभान होऊन नृत्यांगनाबरोबर मुक्तपणे नाचत होते. तेव्हा इतरांनी गुपचूपपणे प्राध्यापक नाचतानाची छायाचित्रे काढली आणि चित्रिकरणही केले.
हेही वाचा : राष्ट्रवादीत फूट पडण्याला कोण कारणीभूत ठरलं? जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…
त्यानंतर या टोळक्याने प्राध्यापक महाशयास आपला रंग दाखविण्यास सुरूवात केली. डान्सबारमध्ये नाचतानाचे छायाचित्र आणि चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित करण्याची तसेच महाविद्यालयासही हे छायाचित्र आणि चित्रफित पाठवून नोकरी घालविण्याची धमकी देत दोन लाख रूपयांची खंडणी मागितली. तसेच महाविद्यालयासह विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाकडे तक्रारही केली. तरीही खंडणी देत नसल्यामुळे प्राध्यापकाचा छळ सुरू केला. तेव्हा अखेर पीडित प्राध्यापकाने थेट पोलिसांत धाव घेतली.