सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपने विद्यमान खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांचा पत्ता कापून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिल्यानंतर ते सोलापुरात दाखल झाले. भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. सोलापुरात आपली लढत माजी मुख्यमंत्र्याची कन्या विरूध्द ऊसतोड कामगाराचा मुलगा अशी होणार असल्याचे भाष्य केले.
सायंकाळी आमदार सातपुते यांचे आगमन पुणे चौत्रा नाक्यावर छत्रपती संभाजी महाराज चौकात झाले. तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले. छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन शिवछत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन केले. चार हुतात्मे पुतळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, वि. दा. सावरकर आदींच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह शोभायात्रेद्वारे जाताना त्यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले.
हेही वाचा…सोलापूर : कर्जवसुलीसाठी व्यापाऱ्यावर गोळीबार; सावकाराने सुपारी देऊन केला खुनीहल्ला
यावेळी बोलताना आमदार राम सातपुते यांनी आपल्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना उपरा म्हणून अप्रत्यक्षपणे टोला मारला होता. त्यावर बोलताना सातपुते म्हणाले, मी उपरा नसून माझे आई-वडील दोघेही पूर्वीच याच सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांसाठी ऊसतोड मजूर म्हणून काम केले होते. याचा अर्थ आपण सोलापूरचेच आहोत, असा दावा त्यांनी केला.