सोलापूर : सोलापुरात मोदीखान्याजवळील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला तर अन्य एक मुलगी गंभीर अत्यवस्थ असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन्ही मृत मुलींपैकी एका मुलीच्या न्यायवैद्यक तपासणीच्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार तिचा मृत्यू मेंदुज्वरामुळे झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे व भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. तसेच महापालिकेचे प्रशासनही धावून आले. यावेळी स्थानिक झोपडपट्टीवासीयांच्या तीव्र संतापाला लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला सामोरे जावे लागले.
दूषित पाण्यामुळेच दोन मुलींना जीव गमवावे लागले आणि अन्य एक मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. ममता ऊर्फ भाग्यश्री अशोक म्हेत्रे (वय १५) आणि जिया महादेव म्हेत्रे (वय १५) अशी मृत मुलींची नावे आहेत. मृत जिया हिची बहीण जया म्हेत्रे ही छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. घटनास्थळी बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत स्थानिक रहिवाशांनी मृत मुलींच्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिसराला न्याय मिळण्यासाठी बराचवेळ ठिय्या आंदोलन केले.
उन्हाळ्याची तीव्रता वाढलेल्या सोलापुरात एकीकडे पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे त्यातसुद्धा दूषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. मोदीखान्याजवळ बाबू जगजीवनराम झोपडपट्टी, चिंतलवार झोपडपट्टीसह अन्य झोपडपट्ट्या असून तेथे मागासलेला जांबमुनी मोची समाज राहतो. या समाजातील महिला पूर्वी सार्वजनिक उकिरड्यावर काच, प्लास्टिक सामान गोळा करायच्या. अलीकडे उकिरड्यांचे उच्चाटन झाल्यामुळे या महिला घरेलू काम म्हणून किंवा अन्य मिळेल ती कष्टाची कामे करतात. पुरूष मंडळीही मोलमजुरी करतात. गलिच्छ झोपडपट्टीत छोट्या छोट्या पत्र्यांच्या कच्च्या घरांमध्ये राहताना दररोज नरकयातना सहन कराव्या लागतात. पावसाळ्यात थोड्याशा पावसाने परिसरातील गटारी तुंबतात आणि गटारीचे मैलामिश्रीत पाणी घरात येते. या भागात पाणीपुरवठ्याच्या वाहिन्या गटारीच्या चेंबरमधून गेल्या आहेत. जेव्हा गटारीत गाळ साचून गटारीचे चेंबर तुंबते, तेव्हा पिण्याच्या नळाला मैलामिश्रीत दूषित पाणी येते. गेल्या काही महिन्यांपासून दर दहा-बारा दिवसांत दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे स्थानिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. या दूषित पाण्यामुळेच दोन शाळकरी मुलांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या म्हणण्यानुसार दोन्ही मृत मुलींसह अन्य एका मुलीला ताप, डोकेदुखी, मळमळ यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत ममता म्हेत्रे हिला तिच्या कुटुंबीयांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशी १९०९१ तर प्लेटलेट्स २८ हजार इतके होते. एका मृत मुलीच्या न्यायवैद्यक तपासणी अहवालानुसार तिचा मृत्यू मेंदुज्वरामुळे झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे.
दरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर परिसरातील घरोघरी आरोग्य तपासणी केली जात असून पाण्याचे नमुने घेऊन रासायनिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गटारीच्या चेंबरमधून पिण्याच्या पाणीपुरवठ्याची वाहिनी गेली असेल तर त्याची तत्काळ तपासणी करून ती बदलली जाईल. यात प्रशासनातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिल्याचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सांगितले.