सोलापूर : भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात परतलेले ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे पुन्हा सक्रिय होऊन पूर्वीचे सहकारी असलेल्या जुन्या नेत्यांशी संपर्क वाढविला आहे. या गाठीभेटीत महायुतीत असलेल्या नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या राजकीय हालचालींची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, महायुतीनेही लगेचच सावध पवित्रा घेत मोहिते-पाटील यांच्या गाठीभेटी झालेल्या नेत्यांशी संपर्क वाढवून त्यांना प्रचारात जुंपले आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कडवे आव्हान दिले आहे. राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील हे तिघे दिग्गज नेते पुन्हा एकत्र आले आहेत. मोहिते-पाटील यांनी माढ्यासह सोलापूर लोकसभा निवडणूकही मनावर घेतली आहे. माढ्यातील रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि सोलापुरातील राम सातपुते या दोन्ही भाजपच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी मोहिते-पाटील यांनी डावपेच आखायला सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून ते आपल्या जुन्या सहकारी नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघाशी संबंधित मोहोळ तालुक्याचे वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांना भेटण्यासाठी विजयसिंह मोहिते-पाटील हे थेट अनगरमध्ये पाटील वाड्यावर आले. राजन पाटील यांनी त्यांचे हृद्य स्वागत करून दोन्ही कुटुंबांतील जिव्हाळ्याच्या नात्यांना उजाळा दिला. यावेळी मोहिते-पाटील व राजन पाटील यांच्यात दोन तास गप्पागोष्टी झाल्या. राजन पाटील हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. मात्र मोहिते-पाटील यांच्या भेटीनंतर राजन पाटील चर्चेत आले.
हेही वाचा : सांगली: मविआतील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी दबावाचे राजकारण
या पार्श्वभूमीवर राजन पाटील यांनी मोहिते-पाटील आणि शरद पवार हेष दोघे आपले ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आहेत खरे; परंतु सध्या आपण राष्ट्रवादी अजित पवार गटात आहोत. त्यांच्या सूचनेनुसार आपण सोलापूर लोकसभेसाठी महायुतीचेच काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, मोहिते-पाटील आणि राजन पाटील यांच्या भेटीपश्चात सावध झालेल्या भाजपच्या नेत्यांनी राजन पाटील यांच्याशी संपर्क वाढवून त्यांना भाजपच्या प्रचारात जुंपले आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते हे राजन पाटील यांना सोबत घेऊन मोहोळ तालुक्यात गावोगावी फिरत आहेत. राजन पाटील यांनीही सोलापूर लोकसभा मतदारसंघात अन्य तालुक्यांपेक्षा जास्त मताधिक्य मोहोळ तालुक्यातून भाजपला मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे.
हेही वाचा : सांगली: भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी
‘ती’ भेट कौटुंबीक; प्रचार महायुतीचाच
ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी आमचा वडिलांपासून कौटुंबीक जिव्हाळा आहे. ते आमचे आमचे मार्गदर्शक नेते आहेत. त्यांनी घेतलेली भेट पूर्ण कोटुंबीक होती. त्यांच्याशी राजकीय चर्चा झाली नाही. आपण सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात म्हणजेच महायुतीत आहोत. लोकसभा निवडणुकीत महायुतीचेच काम करणार आहोत.
राजन पाटील, माजी आमदार, मोहोळ