सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एका खासगी कार्यक्रमासाठी पंढरपुरात दाखल झाले असता, त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत आणि सोलापूर विभाग जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हे सामोरे गेल्याचे पाहायला मिळाले.

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पंढरपुरातील हॉटेलच्या उद्घाटनासाठी ठाकरे आले होते. या निमित्ताने मनसेच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांसह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी आले होते.

अलीकडे राज ठाकरे हे भाजपविरोधात सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. भ्रष्ट नेत्यांना तुरुंगात पाठविण्याऐवजी सत्तेत सहभागी करून घेण्याचे काम भाजप करीत आहे. विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया संशयास्पद आहे, अशा शब्दांत ठाकरे हे भाजपवर निशाणा साधत असताना त्यांचा प्रमुख मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. प्रा. शिवाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे बंधू आहेत.

राज ठाकरे यांच्या केलेल्या स्वागतावर भाष्य करताना प्रा. सावंत यांनी, यात कोणतेही राजकारण नसल्याचा दावा केला. ज्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे आले, त्या हॉटेलचे मालक दिलीप धोत्रे यांनी आपणासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रित केले होते. त्यानुसार आपण त्या कार्यक्रमास गेलो असता, राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यात कोणतीही आक्षेपार्ह बाब नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader