सोलापूर : १८ व्या गठीत होणा-या लोकसभेत खासदारकीची शपथ घेताना एमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी ‘ जय फिलिस्तान ‘ म्हणून नारा दिल्यामुळे त्यांच्या विरोधात सोलापुरात शिवसेना एकनाथ शिंदे गटाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ओवैसी यांच्या प्रतिमेला जोड्यांनी मारून संताप व्यक्त करताना त्यांची खासदारकी तातडीने रद्द करण्याची मागणीही करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. पक्षाचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात तुकाराम म्हस्के, राजकुमार शिंदे, मनीषा नलावडे, संजय सरवदे यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते.

हेही वाचा : Video: सांगलीतील वारणावतीमध्ये अजगराचे दर्शन

यावेळी औवैसी यांच्या वर्तणुकीबद्दल तीव्र भावना व्यक्त करताना अमोलबापू शिंदे म्हणाले, असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेत असताना ‘ जय फिलिस्तान ‘ चा नारा देणे धक्कादायक आहे. त्यांचे हे वागणे संविधानाचा सरळ सरळ अवमान आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून नेहमीच वाद निर्माण होतात. कधी पाकिस्तानच्या तर कधी फिलिस्तानच्या बाजूने गरळ ओकणारे ओवैसी यांना खासदारपदावर राहण्याचा काडीमार्त अधिकार उरला नाही. त्यांनी संविधानाचा आणि संपूर्ण देशाचा अपमान केला आहे. त्यांना माफ केले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली.