Solapur Siddheshwar Yatra Festival : नऊशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेला रविवारी सकाळी मानाच्या नंदीध्वजांच्या भव्य मिरवणुकीने आणि शहराच्या पंचक्रोशीतील ६८ शिवलिंगांच्या तैलाभिषेकाने प्रारंभ झाला. यात्रेनिमित्त सिद्धेश्वर मंदिर परिसर, पंचकट्टा, होम मैदान भागात मोठ्या प्रमाणात विविध दालने उभारण्यात आली आहेत. सकाळी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाड्यातून उंच नंदीध्वजाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. तत्पूर्वी, सागर हिरेहब्बू आणि मानकरी राजशेखर देशमुख यांनी नंदीध्वजांचे पूजन केले. यावेळी शेकडो महिलांनी नंदीध्वजांना नैवेद्य अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी संपूर्ण परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समितीचे प्रमुख महादेव चाकोते, आमदार विश्वनाथ चाकोते, पोलीस आयुक्त एम. कुमार, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मिरवणुकीस प्रारंभ होताना सिद्धेश्वर देवस्थान समितीचे दोन, विश्व ब्राह्मण सुवर्णकार समाजाचे एक आणि मातंग समाजाचे दोन असे अन्य पाच नंदीध्वज दाखल झाले. मिरवणुकीच्या अग्रभागी पंचरंगी ध्वज होता. सनई चौघडा, हलगी पथक, संगीत ब्रॉस पथक, नाशिक ढोल अशी अनेक वाद्यपथकांनी मिरवणुकीला जोश भरला होता. विजापूरवेशीत स्थानिक मुस्लिम बांधवांनी नंदीध्वजांसह श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली.
हेही वाचा : लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”
विविध पारंपरिक मार्गावरून हा मिरवणूक सोहळा हळूहळू दुपारी सिद्धेश्वर मंदिरात पोहोचला. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जुन्या फाटकासमोर नंदीध्वज दाखल झाल्यानंतर तेथे हिरेहब्बू मंडळींना मानाचा सरकारी आहेर करण्यात आला. ब्रिटिश काळापासून याच ठिकाणी आहेर देण्याची परंपरा आहे.
हेही वाचा : Amruta Fadnavis : “आज माझ्या नणंदा…” अमृता फडणवीसांनी हळदीकुंकूच्या कार्यक्रमात घेतला झक्कास उखाणा!
सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या पारंपरिक धार्मिक विधी नंतर नंदीध्वज शहराच्या पंचक्रोशीतील ६८ शिवलिंगाना तैलाभिषेक करण्यासाठी निघाले. रात्री उशिरा तैलाभिषेक पूर्ण झाल्यानंतर नंदीध्वज उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाड्यात येऊन विसावले. मिरवणूक मार्गावर पावलोपावली भाविकांनी नंदीध्वजांचे सश्रद्ध भावनेने दर्शन घेतले. यात्रेनिमित्त सिद्धेश्वर मंदिर, होम मैदान, पंचकट्टा परिसर फुलून गेला आहे. देशाच्या विविध प्रांतात अनेक व्यापाऱ्यांनी यात्रेत विविध मनोरंजन व करमणुकीसह मेवा मिठाईसह अन्य खाद्यपदार्थ, लहान मुलांची खेळणी, सौंदर्य प्रसाधने, संसारोपयोगी वस्तूंची दालने यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. महाराष्ट्र व कर्नाटकासह तेलंगणा व अन्य प्रांतातून भाविक सोलापुरात दाखल होत आहेत. यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन प्रणाली राबविली आहे. सुमारे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रेत गर्दीमुळे होणारे धुळीचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येक दालनासमोर चटई अंथरणे, पाणी फवारणे अशा माध्यमातून दक्षता घेतली जात आहे.