सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकांची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्या काळात कोणत्याही धर्माच्या मुद्यावर प्रचार करून मतदारांना आकृष्ट करता येणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाईल. तसेच निवडणूक आचारसंहिता काळात पेडन्यूजचे प्रकार थांबविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून यासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास अवश्य कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.
आगामी सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकांच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी देशपांडे सोलापुरात आले होते. त्यावेळी एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू होण्यापूर्वी मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या काही गोष्टी घडत असतील तर त्यावर कारवाई करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा…आमदार गायकवाडांविरुद्धचे शुक्लकाष्ठ थांबेना….पुन्हा नवीन गुन्हा दाखल
निवडणूक आदर्श आचारसंहिता राबविताना त्या अनुषंगाने कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मतदारांवर आर्थिक आमीष दाखवून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने प्रभावित करता येणार नाही किंवा दबाव आणता येणार नाही. त्यादृष्टीने निवडणूक यंत्रणा गांभीर्याने लक्ष ठेवून राहणार आहे. विशेषतः कोणत्याही धार्मिक मुद्यावर प्रचार किंवा टीका टिप्पणी करता येणार नाही. जर कोठे तसा प्रकार आढळून आल्यास किंवा तशा तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना देशपांडे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा…मंदिरात जिवंत नागपूजा, पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
निवडणूक आचारसंहिता काळात ‘पेडन्यूज’चे प्रकार घडतात. त्यावर प्रभावीपणे आळा घालताना आधुनिक तंत्रज्ञान, पोलिसांची सायबर शाखाआदी यंत्रणांची मदत घेतली जाते. मात्र आतापर्यंत पेडन्यूज प्रकारांना प्रभावीपणे आळा बसला नाही, अशी कबुलीही देशपांडे यांनी दिली.