सोलापूर : आपला भारत देश गांधी-नेहरूंच्या लोकशाहीवर निष्ठा ठेवणारा आहे. परंतु लोकशाहीवरचा विश्वास नसलेली शक्ती सत्तेवर आल्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. पुढील काळात हुकूमशहांचे वर्चस्व निर्माण होऊन भारताची परिस्थिती रशियासारखी होईल. म्हणून यंदाची लोकसभा निवडणूक अधिक सजग राहून लढावी लागणार आहे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ येथे आयोजित सभेत शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परखड शब्दांत टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नरेंद्र मोदी पूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते बरे होते. परंतु नंतर पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांत त्यांच्यात निव्वळ खोटारडेपणा जाणवतो, दहा वर्षांत त्यांनी भूलभुलैया करून केवळ खोटे बोलून जनतेला फसविले. खोटे बोलायला मर्यादा असते. ही मर्यादाच मोदी यांनी तोडली आहे, असा आरोप शिंदे यांनी केला. मोदींची गॅरंटी म्हणजे पुन्हा जनतेला फसविण्याची जुमलेबाजी आहे, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा : “भाजपाचं लक्ष्य स्पष्ट, पण बंदूक अजित पवारांच्या खांद्यावर”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांचा पलटवार

सोलापूर जिल्ह्यात आपण सत्तेवर असताना अनेक विकासकामे केली. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, देशात एकमेव एकाच जिल्ह्यासाठी उभारलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, एनटीपीसी, सोलापूर-पुणे आणि सोलापूर-हैदराबाद महामार्गासह पालखी मार्गाचे चौपदरीकरण, रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण ही विकासकामे आपण सत्तेत असताना आणली. परंतु यापैकी काही प्रकल्पाचे आयते उद्घाटन पंतप्रधान मोदी करत आहेत. ही स्थिती सोलापूरचीच नाही तर संपूर्ण देशाची आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी भाजप व मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. आपल्या कन्या आमदार प्रणिती शिदे यांना भाजपमध्ये ओढण्यासाठी शेवटच्या क्षणांपर्यंत प्रयत्न झाले. परंतु, प्रणितींच्या रक्तातच गांधी-नेहरूंचा काँग्रेसी विचार ठासून भरला आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur sushilkumar shinde said those who dont believe in democracy threaten country with dictatorship css