सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळामुळे खरीप व रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर बाधित शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या, शासनाने तात्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. केंद्रीय पथकाकडे करमाळा तालुक्याच्या घोटी, वरकुटे, नेरले व सालसे या गावातील शेतकरी कमी पाऊस झाल्याने खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झालेले असून, हातात काहीही पीक आलेले नाही, हे सांगत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आसवे थांबत नव्हती. दुष्काळी परिस्थितीची दाहकता व त्यामुळे झालेले शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान याची दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी सर्व ठिकाणी करण्यात येत होती.
हेही वाचा : अजित पवारांच्या अडचणी का वाढतायत? ज्योतिषांनी मांडली कुंडली, भविष्यवाणी करत म्हणाले, “एप्रिल २०२४ पासून..”
यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने राज्य शासनाने माळशिरस, बार्शी, सांगोला, माढा व करमाळा या पाच तालुक्यांत तर जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील ४५ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. केंद्र शासनाकडूनही दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पाहणी पथक जिल्ह्यात आले आहे. या पथकात केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिव सरोजिनी रावत यांनी करमाळा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बाधित रब्बी पिकांची पाहणी केली. याशिवाय केंद्रीय पथकाने माळशिरस व सांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील दुष्काळाच्या तीव्रतेची तसेच नुकसान झालेल्या तूर, मका, ज्वारी, डाळिंब पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शेतातील विंधन विहिरी तसेच जलसंपदा विभागाकडील पाझर तलावाचीही प्रत्यक्ष पाहणी केली. केंद्रीय पथकाच्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी जिल्ह्यातील टंचाईच्या परिस्थितीची तसेच यामुळे झालेल्या खरीप व रब्बी पिकाच्या नुकसानीची माहिती दिली.