सोलापूर : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना तेथील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) नेते, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या कन्या आमदार कविता यांनी नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून सोलापुरात येऊन काँग्रेस व भाजपवर हल्लाबोल केला. तेलंगणात निवडणूकपूर्व बहुमत चाचणी कशीही आसो, परंतु सलग तिसऱ्यांदा बीआरएस पक्षाचीच सत्ता कायम राहील, असा दावा त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीआरएस पक्षाने सोलापुरात जाळे विणले असून पंढरपूरच्या मागील आषाढी यात्रेचे निमित्त पुढे करून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे संपूर्ण मंत्रिमंडळासह पक्षाच्या आमदार-खासदार व नेत्यांचा मिळून सहाशे वाहनांचा ताफा घेऊन सोलापुरात आले होते. त्यावेळी या झांजावती दौऱ्यात ते काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपवर कडाडले होते. त्यानंतर त्यांच्या कन्या आमदार कविता सोलापुरात येऊन जोरदार कडाडल्या. नवरात्रौत्सवात सोलापुरातील तेलुगु भाषक समाजामध्ये महिला ‘ब्रतुकम्मा’ उत्सव साजरा करतात. फुलांनी आकर्षक सजावट केलेल्या प्रतिकात्मक देवीसमोर महिला फेर धरून पारंपारिक भक्तिगीते गातात आणि लोकनृत्य करतात.

हेही वाचा : “पुतण्या फुटला, मात्र लांडग्याची पिलावळ भुजबळांमागे”, शरद पवारांवर पडळकरांची अप्रत्यक्ष टीका

या उत्सवात सहभागी होण्यासाठी केसीआर कन्या आमदार कविता सोलापुरात आल्या होत्या. भवानी पेठेतील बीआरएसचे स्थानिक नेते नागेश वल्याळ यांच्या निवासस्थानी येऊन त्यांनी ब्रतुकम्मा उत्सवात सहभाग घेतला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेलंगणामध्ये मागील सलग दहा वर्षे मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकारने सर्वसमावेशक लोककल्याणाची असंख्य कामे केली आहेत. सर्वांगीण विकास करताना शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे व्यापारी-उद्योजक, महिला, तरूण, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आदी सर्व घटकांचे जीवनमान उंचावले आहे. याच विकासाच्या बळावर बीआरएस पक्षाने अवघ्या तेलंगणावासियांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळेच सलग तिसऱ्यांदा केसीआर यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकार सत्तेवर कायम राहील, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा : “…म्हणून नारायण राणे मराठा आरक्षणाचा विषय भरकवटण्याचा प्रयत्न करत आहेत”, सुजात आंबेडकरांचं विधान

तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळेल, अशी निवडणूकपूर्व बहुमत चाचणी समोर मांडली जात असली तरी ही बहुमत चाचणी एका बंद खोलीत बसून तयार केली गेल्याचे वाटते. कारण यात तेथील सर्व घटकांचा कल जाणून घेण्यात आला नाही, अशा बहुमत चाचण्या खोट्या असतात, हे प्रत्यक्ष निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त करतना आमदार कविता यांनी काँग्रेस व भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशात आता काँग्रेस पक्ष तिसऱ्या-चौथ्या स्थानावर गेला आहे. या पक्षाला बीआरएस हा पक्ष भाजपची बी टीम आहे, असे म्हणण्याचा अधिकार नाही. काँग्रेसने तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मतदारांना किती मोठमोठी आश्वासने दिली तरी या पक्षाची विश्वासार्हता पूर्वीच संपली आहे. भाजपची डाळ तर अजिबात शिजणार नाही.

हेही वाचा : VIDEO: पुण्यात चालकाने बस रिव्हर्स चालवत अनेक वाहनांना उडवलं; सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला ११९ जागांवर अनामत रकमा गमवाव्या लागल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत त्यापेक्षा अधिक जागांवर भाजपची हीच गत होईल. बीआरएस पक्षाला शंभरपेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा करताना, आमदार कविता यांनी तेलंगणात पुन्हा केसीआर सरकार स्थापन झाल्यानंतर आपण स्वतः पुन्हा सोलापुरात येऊन विजयोत्सव साजरा करू, असेही जाहीर केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur telangana cm kcr daughter kavitha participated in bathukamma celebration and also criticised bjp congress css
Show comments