लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर: प्रेमविवाहाला विरोध करणा-या जन्मदात्या वडिलांचे हातपाय तोडण्याची सुपारी मुलीनेच आपला प्रियकर आणि त्याच्या साथीदारांना दिली. त्यानुसार वडिलांवर प्राणघातक हल्ला झाला असता मुलीने रचलेला बनाव माढा पोलिसांनी अवघ्या काही तासांतच उघडा पाडत तिच्या प्रियकरासह पाच हल्लेखोरांना अटक केली आहे.

आयुष्यभर अहिंसा परमो धर्म तत्वाचे पालन करणा-या माढा येथील एका प्रसिध्द व्यापा-यावर प्राणघातक हल्ल्याच्या रूपाने पोटच्या मुलीकडूनच ही आफत कोसळली. याप्रकरणी संबंधित मुलीसह तिचा प्रियकर चैतन्य कांबळे तसेच आतिश लंकेश्वर, रामा पवार, आनंद ऊर्फ बंडू जाधव, मयूर चंदनशिवे अशा पाचजणांना अटक करण्यात आली असून सर्वांना पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या व्यापा-यावर सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात वैद्यकीय उपचार होत आहेत.

हेही वाचा… VIDEO : “शिवसेना विझली, तर महाराष्ट्रातील आग संपेल”, संजय राऊतांचा धडाकेबाज प्रोमो समोर

माढा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या नोंदीनुसार जखमी व्यापा-याच्या मुलीचे एका तरूणाबरोबर प्रेमप्रकरण होते. त्यांनी घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करण्याच्या आणाभाका घेतल्या ख-या; परंतु वडिलांचा विरोध होईल म्हणून मुलीने निष्ठूर होऊन वडिलांचेच हातपाय तोडले तर त्यांचा अडथळा दूर होईल, अशी शक्कल लढविली. त्यासाठी प्रियकरासह त्याच्या साथीदारांना प्रत्येकी १५ हजार रूपयांची सुपारी दिली. वडिलांवर हल्ला झाल्यानंतर पुन्हा मुलीनेच बनाव रचून अज्ञात व्यक्तींनी वडिलांना मारहाण केल्याची माहिती पोलिसांना दिली. परंतु चौकशीत विसंगती आढळून आल्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले.

हेही वाचा… “पंतप्रधान मोदींचं वक्तव्य पूर्णपणे असत्य”, शिवसेना-भाजपा युती तोडण्याबाबत एकनाथ खडसेंचं महत्त्वाचं विधान

वडिलांनी व्यावसायिक कामासाठी मुलीला नेहमीप्रमाणे पुण्याला पाठविले होते. तेथील काम उरकून मुलगी पुणे-सोलापूर शिवशाही बसने सायंकाळी माढ्यास परत निघाली होती. तिने टेंभुर्णीपर्यंत प्रवास तिकीट काढले होते. मात्र वडिलांनी संपर्क साधून पुढे शेटफळपर्यंतचे तिकीट काढून तेथे उतर, मी तेथून तुला घेऊन जायला मोटार कार आणतो, असे कळविले. त्यानुसार ती रात्री शेटफळ येथे आली आणि ती वडिलांच्या मोटारीत बसून माढ्याकडे निघाली. परंतु वाटेत वडाची वाडीजवळ मुलीने लघुशंकेचे निमित्त करून वडिलांना मोटार थांबविण्यास सांगितले. त्यानुसार मोटार थांबली आणि मुलीसह वडील दोघेही मोटारीतून बाहेर आले असता अचानकपणे दुचाकी गाड्या उडवत आलेल्या चौघा तरूणांनी मुलीच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला केला. यात गंभीर जखमी होऊन ते खाली कोसळले. हल्लेखोरही पसार झाले, असे मुलीने पोलिसांना कळविले होते.

हेही वाचा… “…तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हलू दिली नसती”, पंतप्रधानांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरे गटातील नेत्याचं विधान

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन निरीक्षण केल्यानंतर चौकशीत विसंगती दिसून आली आणि मुलीने प्रेमविवाहासाठी आंधळी होऊन वडिलांनाच धडा शिकविण्यासाठी प्रियकरासह त्याच्या साथीदारांना सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे, तपास अधिकारी फौजदार एम. एम.शेख व त्यांच्या पथकाने या धक्कादायक गुन्ह्याची यशस्वीपणे उकल केली.