सोलापूर : ऊस वाहतुकीसाठी चालू स्थितीत थांबलेल्या ट्रॅक्टरवर चढताना ट्रॅक्टरचा गियर अचानक पडल्याने घडलेल्या अपघातात ऊसतोड मजुराच्या कुटुंबातील दोन बहिणी जागीच मृत्युमुखी पडल्या. मोहोळ तालुक्यातील आष्टी गावच्या शिवारात सायंकाळी ही दुर्घटना घडली. नीता राजू राठोड (वय २०) आणि तिची धाकटी बहीण अतिश्री (वय ४, रा. पाटागुडा, ता. जिवती, जि. चंद्रपूर) अशी या अपघातातील दोन्ही मृत बहिणींची नावे आहेत. या संदर्भात त्यांची आई शानुबाई राजू राठोड (वय ३७) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टरचालक सुनील गुलाब राठोड (रा. डिग्रज, ता. कंधार, जि. नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

ऊसतोड मजुरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या शानुबाई आणि त्यांचे पती राजू राठोड यांना पाच मुली आणि एक मुलगा आहे. यंदाच्या गळीत हंगामात मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते साखर कारखान्यासाठी ऊसतोडीकरिता राठोड दांपत्य मुलामुलींसह आले होते. आष्टी येथे कुंडलिक गावडे यांच्या शेतातील ऊसतोड करून सायंकाळी कारखान्याकडे जाण्याची तयारी सुरू असताना ट्रॅक्टरचालक सुनील राठोड याने ट्रॅक्टर बंद न ठेवता चालू स्थितीत ठेवला होता. राजू राठोड यांची मुलगी नीता ही धाकटी बहीण अतिश्री हिला कडेवर घेऊन ट्रॅक्टरवर चढत होती. तेव्हा चालू स्थितीतील ट्रॅक्टरचा गिअर अचानकपणे पडल्याने ट्रॅक्टर झटक्यात पुढे गेला. त्यावेळी नीता व अतिश्री दोघीही ट्रॅक्टरवरून खाली कोसळल्या. नंतर क्षणातच ट्रॅक्टरच्या चाकाखाली दोघी आल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Story img Loader