सोलापूर : तापमानाचा पारा किंचित खाली आला तरी उष्मा कायम असल्यामुळे अंगाची लाही लाही होत असतानाही सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजपच्या तुल्यबळ लढतीत चुरशीने मतदान झाले. सकाळी आणि सायंकाळी मतदार केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४९.८५ टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती निवडणूक अधिका-यांकडून देण्यात आली. शेवटच्या तासात मतदारांचा उत्साह सर्वत्र दिसून आला. सायंकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया संपली तेव्हा सुमारे ५५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरात ५८.४५ टक्के इतके मतदान झाले होते.
सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे व भाजपचे राम सातपुते या दोन्ही तरूण आमदारांमध्ये चुरशीची लढत झाली. त्यांच्यासह बसपाचे बबलू गायकवाड व वंचित बहुजन आघडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे आदी २१ उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले. मात्र मुख्य लढत प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यातच पाहायला मिळाली.
हेही वाचा… उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५८ टक्के मतदान
सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण २० लाख ३० हजार ११९ मतदारंपैकी १० लाख ११ हजार ९४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याशिवाय १२.५६ टक्के तृतीय पंथीय मतदारांनी मतदान केले. एकूण मतदानाची टक्केवारी ४९.८५ इतकी होती. पुरूषांच्या मतदानाची टक्केवारी ५२.३० तर महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी तुलनेने कमी ४७.२७ एवढी होती. शेवटच्या तासाभरात मतदानाचा वेग वाढला होता.
सोलापुरात गेल्या १५ दिवसांपासून तापमानाचा पारा ४१ आंशांपेक्षा जास्त असून अलिकडे तर त्यात वाढ होऊन ४४ अंशांपेक्षा जास्त तापमान आहे. काल सोमवारी ४४.१ अंश सेल्सियस तापमानाचा पारा होता. मंगळवारी मतदानाच्या दिवशी तापमानाचा पारा काहीसा खालावून ४२.२ अंशांवर खाली आला तरी उष्म्याची धग कायम होती. सकाळपासून उन्हाचे असह्य चटके बसत होते. त्यामुळे दुपारचे तपळते ऊन टाळण्यासाठी मतदारांनी सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर जाणे पसंत केले होते. त्यामुळे सकाळी पहिल्या चार तासांत मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा वाढल्या होत्या. मतदान करण्यासाठी जवळपास अर्धा ते पाऊण तासाचि कालावधी लागत होता. सकाळी सात ते नऊ या पहिल्या दोन तासांत ५.९७ टक्के तर सकाळी अकरापर्यंत चार तासांत १६.१७ टक्के मतदान झाले होते. दुपारी एकपर्यंत मतदानाची टक्केवारी पुढे सरकत २९.३१ पर्यंत गेली होती. तर दुपारी तीनपर्यंत ४०.१८ टक्के मतदान झाले होते. पुरूषांच्या तुलनेत महिला मतदारांच्या मतदानाचे प्रमाण कमी होते.
हेही वाचा… इस्लामपूरजवळ साखराळेत युती-आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
सायंकाळी पाच वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघ झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता सर्वाधिक ५२.२२ टक्के मतदान मोहोळ येथे झाले. तर सर्वात कमी मतदान ४७.०१ टक्के मतदान सोलापूर शहर मध्य मतदारसंघात झाले. सोलापूर शहर उत्तर-५१.२१ टक्के, दक्षिण सोलापूर-५१.८८ टक्के, अक्कलकोट-४७.८५ टक्के आणि पंढरपूर-मंगळवेढा येथे ४९.१० टक्के मतदान झाले होते.
सकाळपासून सायंकाळी मतदान संपेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसत होता. दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांपासून मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांच्या वसाहतींपर्यंतच्या भागात मतदारांचा उत्साह दिसत असताना दुसरीकडे मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे वगळल्याचे प्रकार निदर्शनास आले. त्यामुळे नैराश्य पाहायला मिळाले. आद्ययावत मतदार ओळखपत्र असूनही प्रत्यक्ष मतदार याद्यांमधील मतदारांची नावेच गायब झाल्यामुळे संबंधित मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. याबाबतचा संताप दिसून आला. याशिवाय मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन येणा-या मतदारांना पोलिसांनी परत पाठविल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करण्यास बंदी आहे. परंतु तेथे सोबत मोबाईल नेताना तो सायलेंट मोडवर किंवा बंद करून ठेवण्याच्याअधिकृतमार्गदर्शक सूचना होत्या.