सोलापूर : सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह भीमा खो-यात पडणा-या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठा झटपट वधारत असून शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास धरण वजा पातळीतून उपयुक्त पातळीत आले. त्यानंतर दुपारी तीनपर्यंत धरणात एकूण ६७.६७ टीएमसी पाणीसाठा वाढला होता. तर उपयुक्त पाणीसाठा ४.०१ टीएमसी एवढा होऊन त्याची टक्केवारी ७.४९ वर पोहोचली होती. दुसरीकडे दौंड येथून धरणात येणा-या पाण्याचा विसर्ग तब्बल एक लाख ८८ हजार २६६ क्युसेकपर्यंत वाढल्यामुळे रात्रीपर्यंत धरण १२ टक्क्यांपर्यंत वधारण्याची आशा निर्माण झाली होती.
दरम्यान, उजनी धरणात पुण्यातील खडकवासला धरणातून बंडगार्डनमार्गे सोडलेल्या पाण्याचा विसर्ग दुपारी घटला. सकाळी सहापर्यंत बंडगार्डनमधून भीमा नदीत एक लाख पाच हजारांपेक्षा जास्त क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात होते. तर खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग कमी करून ३० हजार ९४२ क्युसेकपर्यंत करण्यात आला होता. त्यात दुपारी कपात होऊन तो १३ हजार ९८१ क्युसेकपर्यंत खालावला. त्यामुळे दौड येथून उजनी धरणात सोडलेल्या पाण्याच्या विसर्गात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गतवर्षी अत्यल्प पावसामुळे उजनी धरण अवघे ६०.६६ टक्क्यांपर्यंत भरले होते. त्यात पुन्हा पाणी वाटप नियोजनाचा बोजवारा उडाल्यामुळे धरण काही दिवसातच वजा पातळीत आले होते. उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीची भर पडल्यामुळे गेल्या ७ जूनपर्यंत वजा ५९.९९ टक्के इतके खालावले होते. परंतु नंतर सुदैवाने मृग नक्षत्राच्या पावसामुळे धरणात हळूहळू पाणीसाठा वाढत गेला. मागील पाच दिवसांत सह्याद्री घाटमाथ्यावर, भीमा खो-यात मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे त्याच जोरावर इकडे दौंडमार्गे उजनी धरणात येणा-या पाण्याचा विसर्ग वाढला आहे.
हेही वाचा : रत्नागिरी: राजापूर शहराला पुन्हा पुराचा फटका; पाच वेळा पुर आल्याने व्यापाऱ्यांचे हाल
तब्बल १२३ टीएमसी एवढ्या महाकाय क्षमतेचे उजनी धरण एरव्ही, उन्हाळ्यात एप्रिल-मे दरम्यान वजा पातळीत जाते आणि जुलैमध्ये उपयुक्त पातळीत येत असते. यापूर्वीच्या चार वर्षांचा मागोवा घेतला असता १८ जुलै २०२२, २२ जुलै २०२१, १२ जुलै २०२२ आणि १ आॕगस्ट २०२३ रोजी धरण उपयुक्त पातळीत आले होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाच दिवस अगोदर धरण उपयुक्त पातळीत आल्याचे पाहायला मिळाले.