सोलापूर : सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इकडे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. अवघ्या २४ तासांत धरणात पाच टीएमसी पाणीसाठा वधारला असून शुक्रवारी धरणातील पाणीसाठा प्रथमच उपयुक्त पातळीत येण्याची अपेक्षा आहे.
सायंकाळी उजनी धरणातील एकूण पाणीसाठा ५७.९६ टीएमसीपर्यंत वाढला होता. त्याची टक्केवारी वजा १०.६३ इतकी होती. म्हणजेच धरण वजा पातळीतून उपयुक्त पातळीत येण्यासाठी आणखी केवळ ५.७९ टीएमसी पाणीसाठ्याची गरज होती. गुरूवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या १२ तासांत धरणात सव्वा टीएमसी म्हणजेच अडीच टक्के पाणीसाठा वाढला होता. सकाळी दौंड येथून धरणात येणा-या पाण्याचा विसर्ग वाढून ४३ हजार १५० क्युसेकवर पोहोचला होता. त्यात पुन्हा वाढ होऊन तब्बल ८० हजार क्युसेकवर गेला होता.
हेही वाचा : Ashish Shelar :देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणाऱ्या अनिल देशमुखांना आशिष शेलारांचे चार प्रश्न, म्हणाले…
दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील बंडगार्डन येथून एक लाख क्युसेक विसर्गाने पाण्याचा प्रवाह दौंडच्या दिशेने येत आहे. आणखी काही धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे उद्या शुक्रवारी दौंड येथून उजनी धरणात येणा-या पाण्याचा विसर्ग एक लाख ८० हजार क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून ३५ हजार क्युसेकने सोडलेला विसर्ग सायंकाळी कमी होऊन तो १५ हजार क्युसेकवर थांबल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.