सोलापूर : भर रस्त्यावर हाणामारी करीत स्वत:चे डोके आणि तोंड फूटपाथवर आपटून घेणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणत असताना त्या तरुणाने पोलीस शिपायाला धक्काबुक्की केली आणि त्यांच्या अंगावर थुंकण्याचा प्रकार केला. नंतर पोलीस ठाण्यातही पुन्हा हेच कृत्य करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकावरही त्या तरुणाने हल्ला केला. ही धक्कादायक घटना सोलापुरात रामलाल चौक ते फौजदार चावडी पोलीस ठाण्यापर्यंत घडली.
याप्रकरणी ओंकार ऊर्फ नाईंट्या संतोष नलावडे (रा. सुंदराबाई डागा प्रशालेजवळ, बांध वस्ती, दमाणीनगर, सोलापूर) यांस अटक करण्यात आली आहे. त्याने स्वतः रस्त्यावर डोके आणि तोंड आपटून घेतल्याने त्यास जखम झाली असून त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.
याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई दिनेश घंटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ओंकार उर्फ नाईंट्या नलावडे हा सायंकाळी साडेचारच्या सुमारास रामलाल चौकात रस्त्यावर दोन-तीन तरुणांबरोबर भांडत होता. त्यावेळी तो स्वतःचे डोके आणि तोंड फूटपाथवर आपटून घेत होता. त्याची माहिती मिळताच पोलीस शिपाई दिनेश घंटे हे घटनास्थळी आले. ओंकार यास पोलीस ठाण्यात रिक्षातून नेत असताना त्याने पोलीस शिपाई घंटे यांना शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर थुंकले. त्यांच्या शर्टाला धरून ओढाओढी केली. जवळच असलेल्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर जखमी ओंकार यास वैद्यकीय उपचारासाठी दवाखाना यादी तयार करीत असताना तो पुन्हा दुसऱ्यांदा पोलीस शिपाई घंटे यांच्या अंगावर थुंकला आणि आरडाओरडा करू लागला.
त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने येऊन त्यास शांत बसण्यास सांगत असताना ओंकार याने माने यांच्या छातीवर डाव्या बाजूला हाताने जोरात बुक्की मारली. त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावरही हाताने जबर मुक्कामार दिला. यात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर मारहाण करणे, अंगावर थुंकणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.