शेतीला शाश्वत सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी राज्यात एक लाख विहिरी आणि ५० हजार शेततळी निर्माण करण्याचा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनापासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्य़ात दोन हजार कामे करण्यात आली असून, त्यासाठी ५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मार्चअखेर इतक्याच रकमेची कामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्य़ांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य वाटपास सुरुवात होत आहे. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी परवान्याची संख्या कमी करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात धान्य वितरणासाठी उपयोगात येणारी बायोमेट्रिक प्रणाली आणि प्रशासनात राबविण्यात येणाऱ्या मूल्यांकन पद्धतीचा त्यांनी विशेष उल्लेख केला. कुंभमेळ्याच्या माध्यमातून जिल्ह्य़ाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाजन यांच्या हस्ते ‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’ ही सायकल स्पर्धा पूर्ण करणाऱ्या महाजन बंधूंसह इतर खेळाडूंचे अभिनंदन केले. पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

Story img Loader