महाराष्ट्र राज्य हे महिलांसाठी देशातील सर्वाधिक सुरक्षित राज्य असून देशामध्ये सर्वाधिक महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी संख्या गृहविभागात असणारे महाराष्ट्र राज्य हे देशात एकमेव राज्य असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येथे दिली. तुरची (ता. तासगाव) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सामाजिक वनीकरण विभाग, सांगली व ग्रामपंचायत महिला सदस्य यांच्यावतीने पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे आयोजित केलेल्या वृक्षिदडी व वृक्षारोपण कार्यक्रम व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यांनी श्रमदानातून तयार केलेल्या धावपट्टी (रिनग ट्रक)च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दिलीप भुजबळ, तासगाव पंचायत समिती सभापती गोकुळाताई शेंडगे, कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती सुरेखा कोळेकर, सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक संचालक दशरथ गोडसे, जिल्हा होमगार्ड समादेशक डॉ.जयप्रकाश गोरे आदी उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावून ती जगविणे ही काळाची गरज झालेली आहे. बिघडते पर्यावरण सावरण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याची गरज आहे. नुसती झाडे न लावता त्यांचे योग्य प्रकारे संगोपन करणे तितकेच गरजेचे आहे. आज आपण जास्तीत जास्त झाडे लावली, तर भविष्यात त्यांचे चांगले परिणाम आपल्या पाहावयास मिळतील. आपण ज्या प्रमाणे आपल्या अपत्यांचा जिवापाड सांभाळ करतो, त्याच प्रमाणे झाडेही सांभाळली पाहिजेत. या मोहिमेत महिलांनी आघाडी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
पाटील पुढे म्हणाले, की तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रत्येक पोलीस उपनिरीक्षकांना तालुक्यातील एक गाव नेमून देऊन त्यांना त्या गावामध्ये पाठवावे. संबंधित गावातील तंटे, गावामधील गुन्ह्यांची यादी त्याबाबतची वस्तुस्थितीजन्य माहिती, गुन्ह्याबाबत असणाऱ्या समस्या, गावातील लोकांमध्ये मिसळून त्यांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेऊन गुन्हे न घडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना या संबंधित सर्वे करून यादी तयार करावी. ही यादी त्याने आपल्या वरिष्ठांना सादर करावी. त्यामुळे गावागावातील परिस्थितीजन्य माहिती गृहखात्यास मिळेल. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालणे अधिक सोपे होईल व संबंधित पोलीस प्रशिक्षणार्थ्यांस योग्य प्रकारचे प्रशिक्षणही मिळेल. अशा प्रकारची संकल्पना तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्राने राबवावी. ही योजना सफल झाली तर याच योजनेत अधिक सुधारणा करून सदर योजना राज्यातील सर्व पोलीस प्रशिक्षण केद्रांतून राज्यस्तरावर राबविण्याबाबत विचार केला जाईल असेही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.
प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी पाटील यांच्या हस्ते वृक्षिदडीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी दशरथ गोडसे, सुरेखा कोळेकर, योजना शिंदे, सरपंच भारती पाटील,ोारती माने आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमास जि.प.सदस्या छायाताई खरमाटे, स्मिता पाटील तासगाव व कवठेमहांकाळ पंचासत समितीचे सदस्य उपस्थित होते.
देशामध्ये सर्वाधिक महिला पोलीस कर्मचारी राज्यात – आर. आर.
महाराष्ट्र राज्य हे महिलांसाठी देशातील सर्वाधिक सुरक्षित राज्य असून देशामध्ये सर्वाधिक महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी संख्या गृहविभागात असणारे महाराष्ट्र राज्य हे देशात एकमेव राज्य असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येथे दिली.
First published on: 01-07-2014 at 04:04 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the country most women police workers in the the state r r patil