लडाखच्या सियाचीन येथे तैनात असलेले भारतीय लष्कराचे अग्निवीर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांना वीरमरण आलं आहे. लाईन ऑफ ड्युटी येथे तैनात असताना बुलढाण्याच्या पिंपळगाव सराई गावातील सुपूत्र अक्षय लक्ष्मण शहीद झाले असून ते भारतीय लष्कराचे फायर अॅण्ड फ्युरी कॉर्प्सचे भाग होते. दरम्यान, यावरून महाराष्ट्रात आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
अक्षय लक्ष्मण गवते यांच्या पार्थिवावर आज (सोमवार, २३ ऑक्टोबर) त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जेमतेम २२ वर्षे वय असलेल्या जवानाने देशासाठी आपला जीव गमावला. रविवारी संध्याकाळी त्यांचं पार्थिव घेऊन येणारं विमान छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झालं. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हे पार्थिव लष्करी वाहनाने पिंपळगाव सराई येथे नेण्यात आलं. लक्ष्म्ण गवाते हे अग्निवीर योजनेतून भारतीय लष्करात सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना पेन्शन आणि इतर सरकारी लाभ मिळणार नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवारांच्या या दाव्यावर भाजपाने आता चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा >> “बुलढाण्याच्या शहीद अग्निवीराला ना पेन्शन, ना सरकारी योजनेचा लाभ”, रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका
रोहित पवारांचा आरोप काय?
जगातील सर्वांत ऊंच युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्ये देशाचं रक्षण करणारा महाराष्ट्राचा सुपुत्र ‘अग्नीवीर’ अक्षय लक्ष्मण गवते हा शहीद झाला. देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली! दुर्दैवाची बाब म्हणजे अग्निवीर असल्याने देशासाठी बलिदान देऊनही गवाते यांना ना पेन्शन मिळणार, ना इतर सरकारी लाभ मिळणार. पंजाबमधील एक अग्नीवीर शहीद झाल्यानंतरही त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याचा अनुभव आपण नुकताच घेतलाय. ‘अग्नीवीर’ ही देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांची अवहेलना करणारी योजना असल्याने त्यांचा सन्मान राखण्यासाठी आपण सर्वांनीच या योजनेला कडाडून विरोध करायला पाहिजे, असं रोहित पवार यांनी X या समाजमाध्यमावर म्हणाले होते. त्यावर भाजापने प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाचं प्रत्युत्तर काय?
“शहिदांच्या बलिदानाचा उपहास करण्याचे तुच्छ राजकारण कशाला करता? कधी तरी राजकीय बुरखा उतरवून समाजाकडे पाहा. आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत आपण केवळ हेतू परस्पर चुकीची माहिती समाजापुढे आणून युवकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहात”, असं भाजपाच्या अधिकृत X च्या खात्यावर म्हटलं आहे.
“भारतीय सैन्याकडून देण्यात आलेली अधिकृत माहिती एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण एकदा तरी वाचण्याचे कष्ट घ्यायला हवे होते. पण, तुमच्या नीच मानसिकतेत ते बसत नाही. खरं तर शाहिदांची तुलना पैसे, पेन्शनने करणे योग्य नाही. पण, रोहित पवारसारखे अल्पबुद्धी राजकारणी तरुणांची दिशाभूल करत आहेत, म्हणून सत्य मांडणे देखील गरजेचं आहे.”
भारतीय सैन्याकडून आलेल्या अधिकृत माहितीप्रमाणे शहीद अक्षय लक्ष्मण गवते यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारा निधी खालील प्रमाणे,
- नॉन कंट्रिब्युटरी इन्शुरन्स रक्कम, ४८ लाख रुपये देण्यात येणार.
- अग्निवीरने (३०%) योगदान दिलेले सेवा निधी, सरकारच्या समान योगदानासह, आणि त्यावर व्याज.
- ₹ ४४ लाख सानुग्रह.
- मृत्यूच्या तारखेपासून चार वर्षे पूर्ण होईपर्यंत शिल्लक कालावधीचा देय (तात्काळ प्रकरणात १३ लाखांपेक्षा जास्त).
- आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टी फंड मधून ८ लाखांचा निधी देण्यात येणार.
- AWWA कडून तात्काळ ३० हजारांची आर्थिक मदत.
- एकूण मदत १ कोटी १३ लाख इतकी दिली जाईल.
“या निधीतून झालेले नुकसान कधीही भरून निघणार नाही. मात्र शहीद सैनिकाच्या कुटुंबाला आधार म्हणून हा निधी दिला जातो. महाराष्ट्राच्या शहीद सुपुत्राने अगदी कमी वयात आपल्या जीवाची तमा न बाळगता देशासाठी बलिदान दिले. मात्र तुम्हाला अगदी खालच्या थराला जाऊन राजकारण करायची सवय लागली आहे याची प्रचिती महाराष्ट्राला आज पुन्हा आली”, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अग्निवीर अक्षय गवते यांच्या पार्थिवावर काही वेळाने शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. अग्निवीर गवते हे ३० डिसेंबर २०२२ रोजी युनिट ६९ मैदानी रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. ‘टेलिफोन ऑपरेटर’ म्हणून सियाचिन ग्लेशियर भागात ते कर्तव्यावर होते. त्यांनी सैन्यात ९ महिने २१ दिवस सेवा दिली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंजाबमधील एक लष्करी जवान यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी तैनात असलेल्या ठिकाणी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते. याप्रकरणावरूनही देशभर गदारोळ माजला होता. त्यानंतर, भारतीय लष्कराने स्पष्टीकरण दिलं होतं. भारतीय लष्करातील जवान आक्रमणांविरोधात लढताना धारातीर्थ पडले तर त्यांना शहीद असं संबोधलं जातं. त्यामुळे शहीद झालेल्यांवरच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केलं जातं, असं स्पष्टीकरण भारतीय लष्कराने दिलं होतं.