राज्यात शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपा असं तीन चाकी सरकार सत्तेवर आल्यानंतर निधीवाटप करण्यात आलं. वित्तमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या बंडखोर आमदारांना भरघोस निधी दिला असून विरोधी पक्षातील आमदारांना निधी दिला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या मुद्दयावरून वादळी चर्चा सुरू आहे. विधानसभेतील आमदारांना निधी वाटपातील असमानतेचे पडसाद विधान परिषदेत उमटले. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.
निधी वाटपावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित केला. “५० कोटींच्या निधीसाठी मलाही फोन आले होते, हे मी दाव्यानिशी सांगू शकतो”, असं अंबादास म्हणाले. यावरून फडणवीस म्हणाले की, “निधी वाटपासंदर्भात प्रस्ताव येत असतात. प्रस्तावांवर विभाग इपीसी तयार करतं, इपीसी प्रत्येक विभागाकडून आलेले प्रस्ताव, विभागाकडे पैसे किती आहेत, किती समाविष्ट होऊ शकतात, किती खर्च केलाय या अनुषंगाने मान्यता दिली जाते. त्यानंतर चर्चा होऊन मागण्या अंतिम होतात. या सर्व प्रक्रियेमध्ये अनेक वेळा आलेले सर्व प्रस्ताव मंजूर होतातच असे नाही. बरेसचे होत नाहीत.”
अंबादास दानवे काय म्हणाले होते?
“मी दाव्यासहित सांगेन, मलाही ५० कोटींसाठी फोन आले होते. कोणत्या नंबरवरून कोणी फोन केला हे सांगायला भाग पाडू नका. मी सांगू शकतो, पण माझी सांगण्याची मुळीच इच्छा नाही. सर्व आमदारांना समान निधी मिळाला पाहिजे”, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं.
ही राज्याची परंपरा नाही
“मला दुर्देवाने थोडं इतिहासात जावं लागले. ५ वर्षे मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. या पाच वर्षांत एकदाही अशी चर्चा सभागृहात झाली नाही. कारण राज्यात तशी परंपराच नाही.एकदा झाली होती, तेव्हा आम्ही कोर्टात वगैरे गेलो होतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडीच्या काळात एक पैसाही खर्च झाला नाही
“मात्र या राज्यामध्ये अडीच वर्ष जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीच्या काळात एक नवा पैसा खर्च करता आला नाही. राज्याच्या प्रमुखाच्या सहीशिवाय एक पैसाही खर्च करता येत नाही. अडीच वर्षात एक फुटकी कवडी मिळाली नाही. बाकीच्यांना मिळाले. पण कोविड हे फक्त विरोधी पक्षाकरता होतं”, अशी टीकाही त्यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारने नवा पायंडा पाडला
“(महाविकास आघाडीच्या काळात) एक फुटकी कवडी अडीच वर्षांत विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला मिळाला नाही. एक नवीन पायंडा पडला, हे चुकीचं आहे. तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारणार अशा मताचा मी नाही. पण इतिहासात जावंच लागेल. विरोधी पक्षनेत्यांनी आम्हाला जे शहाणपण शिकवलं ते तेव्हाच्या सरकारला शिकवलं असतं तर अशी परिस्थिती आली नसती”, अशी टीका फडणवीसांनी केली.
“मी तुम्हाला काँग्रेसच्या किमान १५ लोकांची नाव देतो, ज्यांची स्थगिती उचलली आहे. यात काही माजी मुख्यमंत्री होते, त्यांची स्थगिती उचलली गेली. १५० कोटींची उचलली गेली. एकीकडे विरोधी पक्षाच्या (महाविकास आघाडीच्या काळात) आमदारांना काहीच मिळालं नाही आणि सत्तारुढ पक्षाला इतका निधी देण्यात आला, हा आक्रोश होता. म्हणून ती स्थगिती देण्यात आली. मेरिटच्या आधारवर ही स्थगिती उचलली. आज आमच्यासोबत राष्ट्रवादी आली. जे लोक नाही त्यांनाही निधी मिळाला . मी काँग्रेसची नावे दाखवतो, ज्यांना कोणत्या ना कोणत्या हेडमध्ये पैसा मिळाला आहे. विधानसभेत ही परिस्थिती आहे, असंही फडणवीस म्हणाले.
विधान परिषदेच्या आमदारांच्या निधीसाठी चर्चा करणार
“विधान परिषदेत परिस्थिती नजरेस आणून दिली आहे. यासंदर्भात मुख्यंत्री आणि अर्थमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. कोणत्याच मतदारसंघावर अन्याय होणार नाही”, अशी ग्वाहीही फडणवीसांनी यावेळी दिली.