गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील पाच दिवसांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांमध्ये पावसामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ जून २०२२ पासून आत्तापर्यंत ७६ जणांचा बळी पावसाने घेतला आहे.
हेही वाचा- अमरावती जिल्ह्यात पूरस्थिती; युवक नदीत वाहून गेला
८३८ घरांना पुराचा फटका
मुसळधार पावसाचा ८३८ घरांना फटका बसला आहे. तर ४९१६ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. पुरग्रस्तांसाठी राज्यात विविध ठिकाणी ३५ मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. मुंबई कोकण सह मराठावाडा आणि विर्दभालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मराठवाडा विदर्भातील जवळपास ३० गावांना पुराचा फटका बसला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोलीत १२८ गावांचा संपर्क तुटला आहे. आत्तापर्यंत जवळपास २०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
हेही वाचा- वर्धा जिल्ह्याला पावसाचा फटका; अनेक गावांचा संपर्क तुटला, मृतांची संख्या सहावर
मुंबईतील चौपाटय़ांवर ४ तासच फिरण्याची मुभा
दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. हवामान विभागाने दिललेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवसांसाठी मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा इशारा असल्यास मुंबईतील चौपाटय़ांवर केवळ सकाळी ६ ते १० या वेळेतच फिरण्यास मुभा देण्यात येणार आहे. पावसाळय़ात भरतीच्यावेळी समुद्रात बुडून वाहून जीव गेल्याच्या दुर्घटना घडत असल्यामुळे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी असे आदेश काढले आहेत. दरम्यान, या पावसाळय़ात आतापर्यंत समुद्रात बुडून सात जणांचे प्राण गेले आहेत.