महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून घेण्यात आलं आहे. आज ३० जानेवारी रोजी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीने अधिकृत पत्रक जारी करून वंचितला महाविकास आघाडीत सामील करून घेतल्याचं जाहीर केलं. या पत्रकावर नाना पटोले, संजय राऊत आणि जयंत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
महाविकास आघाडीने आज बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तसंच, वंचित बहुजन आघाडीसह अनेक राजकीय पक्षांना महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात आलं असून महाविकास आघाडीचा विस्तार झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. तर, २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार असल्याचंही संजय राऊत म्हणाले. यावर प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
हेही वाचा >> महाविकास आघाडीचा विस्तार, वंचितसह ‘या’ पक्षांचाही समावेश; बैठक संपल्यानंतर राऊत म्हणाले….
प्रकाश आबंडेकर म्हणाले, “महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष यांचा अपमान झाला. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्याबाबतच्या पत्रात नाना पटोलेंना सही करण्याचा अधिकार आहे की नाही हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी किंवा रमेश चेन्नथीलाल यांनी स्पष्ट केलं नसलं तरीही आम्ही महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीत सहभागी होणार आहोत. कारण, भाजपा-आरएसएस विरोधात लढणं ही आमची प्राथमिकता आहे.”
हेही वाचा >> महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितचा अपमान? प्रवक्ते पुंडकर म्हणाले, “आम्हाला एक-दीड तास बाहेर बसवून…”
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत अधिकृत पत्र द्यावं, अशी मागणी वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी केलं होतं. या दरम्यान, त्यांना तासभर बैठकीच्या बाहेर ठेवण्यात आलं. त्यामुळे ही अपमानास्पद वागणूक असल्याची प्रतिक्रिया पुंडकरांनी दिली होती. पुंडकरांना दिलेल्या वागणुकीवरून प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या एक्स पोस्टवरून समाचार घेतला आहे. तसंच, आमचा अपमान झाला असला तरीही आम्ही भाजपा-आरएसएसविरोधात लढण्यासाठी पुढच्या बैठकीत एकत्र येऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं.