अरबी समुद्रातील घडामोडींमुळे सोमवारी(आज) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्य़ांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आगामी २४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड, वसई-विरार, मध्य प्रदेशातील काही भाग, तसेच पश्चिम किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत पावसाची तीव्रता कमी होईल पण ढगाळपणा आणि दृश्यमानता कायम राहील, असा अंदाज भारत हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवलेला आहे. तर, आज सकाळपासूनच मुंबईमधील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याचेही दिसून आले.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र, उत्तर महाराष्ट्रावर असलेली चक्रवाती वर्तुळाकार स्थिती या सर्व घडामोडींमुळे शुक्रवारी मुंबईच्या कमाल तापमानात अचानक पाच अंशांची घट झाली, तसेच तुरळक पावसाचीदेखील नोंद झाली. हीच स्थिती रविवारी देखील कायम राहिली. शुक्रवारच्या कमाल तापमानात शनिवारी दोन अंशांची वाढ झाली, मात्र रविवारी त्यामध्ये पुन्हा घट होऊन कुलाबा केंद्रावर २७.४ अंश आणि सांताक्रूझ केंद्रावर २७.६ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले. मोसमातील हे सर्वात कमी कमाल तापमान आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस

दिवसरात्र असलेले ढगाळ, कुंद हवामान, रात्री काही ठिकाणी होणारा तुरळक पाऊस आणि दिवसाच्या तापमानात झालेली घट ही स्थिती मुंबई आणि उपनगरात सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली. तर, दोन दिवसांत नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्य़ात काही ठिकाणी ३७ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.

सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ऐन थंडीच्या हंगामात ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी मुंबई परिसरासह कोकण विभागांत तुरळक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली. आणखी एक ते दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामानाची स्थिती राहण्याची शक्यता आहे.

Story img Loader