सरसंघचालकांच्या उपस्थितीत सातपुडा हिंदू मेळावा
दुसरा धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना ‘घरवापसी’ करण्याची हाक देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू छत्राखाली एकत्र येण्याची गरज गुरूवारी येथे आयोजित सातपुडा हिंदू मेळाव्यात व्यक्त केली.
हिंदू संस्कृतीचे मूळ दऱ्या-खोऱ्यात आणि शेतात आहे. आदिवासी समाजातील विवादांच्या आगीवर स्वार्थी लोक पोळी भाजत असून आदिवासी समाजाने जागृत होऊन अशा शक्तीना त्यांची जागा दाखवून द्यावी, असेही भागवत यांनी नमूद केले. वेगवेगळी उदाहरणे देत भागवत यांनी हिंदू विरोधात कारवाई करणाऱ्यांनाा सज्जड दमही भरला. यावेळी हरिद्वार पीठाचे महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद महाराज यांनीही आदिवासींना घरवापसीचे आवाहन केले. आदिवासी हिंदू होत असून यापुढेही ही प्रकिया सुरू ठेवण्याचा निश्चय करण्याची विनंतीही त्यांनी उपस्थितांना केली.
प्रारंभी सकाळी हजारो युवकांच्या उपस्थितीत शिवाजी नाटय़ मंदीरापासुन शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत पालकमंत्री गिरीश महाजनांसह खा. डॉ हिना गावित आ. डॉ. विजयकुमार गावित यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते. मिरवणुकीत युवकांनी परशु, तलवारी आणि छऱ्यासारखी शस्त्रास्त्रे खुलेआमपणे भिरकावली. पोलिसांनीही या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
‘हिंदू’ हीच भारतीयांची ओळख
भारताने विविधतेचा स्वीकार केला असून, परदेशी जाणारे भारतीय ‘हिंदू’ म्हणूनच ओळखले जातात असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले.
‘आम्ही सारे हिंदूच आहोत. देशात विविधता आहे, मात्र भारतीय लोक जेव्हा परदेशात जातात, तेव्हा तेथील लोक आम्हाला हिंदूच म्हणतात’, असे भागवत यांनी सांगितले.
‘सर्व लोक आमचेच आहेत’, असे स्वत:चे मूलभूत चिंतन असलेला दुसरा एकही देश जगात नाही. असा विचार करणारा भारत हा एकमेव देश आहे, असे स्पष्ट केले.