वाई : महाबळेश्वर पाचगणी येथील २३७ चौरस किलोमीटरचा परीसरात इको सेन्सेटिव्ह झोन जपण्यासाठी उच्च स्तरीय सनियंत्रण समिती काम करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष सुधाकर नागनोरे यांनी पत्रकारांना दिली. केंद्र शासनाने नव्याने देशातील तीन इको सेन्सेटिव्ह झोन निश्चित केले आहेत. त्यात राज्यातील महाबळेश्वर पाचगणी, माथेरान आणि डहाणूचा समावेश आहे. माथेरान प्रमाणे महाबळेश्वर पाचगणीला नो व्हेईकल झोन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी उच्च स्तरीय सनियंत्रण समिती काम करणार असल्याचे नागनोरे यांनी सांगितले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात महाबळेश्वर-पाचगणी इको सेन्सिटिव्ह झोनच्या संनियंत्रण समितीची बैठक अध्यक्ष सुधाकर नागनोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, महाबळेश्वरचे मुख्याधिकारी योगेश पाटील, पाचगणीचे मुख्याधिकारी निखील जाधव आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महाबळेश्वर, पाचगणीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा : नवीन वर्षात ३४९५ एसटी बसेस सेवेत दाखल होणार, सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा
ते म्हणाले, महाबळेश्वर पाचगणी हा भाग केंद्रशासनाने इको सेन्सेटिव्ह झोन असल्याची अधिसुचना २००१ मध्ये काढली होती. त्याच्या बैठका वेळोवेळी झालेल्या आहेत. आता नव्याने २०२२ च्या अधिसुचनेनुसार संनियंत्रण समिती राज्य सरकारने स्थापन केली आहे. या समितीची पहिली बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. महाबळेश्वर पाचगणी दरम्यानचा २३७ चौरस किलोमीटर किलोटरचा परिसर इको-सेन्सेटिव्ह झोनमध्ये येतो. यापैकी २५ चौरस किलोमीटर प्रदेश महाबळेश्वर आणि पाचगणी गिरीस्थान पालिकांच्या अखत्यारीत येतो. या भागाला नैसर्गिक वरदान लाभले आहे. वेण्णा लेक या परिसरातली झाडी असेल, याठिकाणची पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, याबाबत समिती प्रयत्न करेल. या भागात २५० नैसर्गिक रचना आणि मानवनिर्मित वारसास्थळे कलाकृती आहेत. त्यांच्या संवर्धन व्हावे, महाबळेश्वरमध्ये अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे होवू नयेत, यासाठी वेळीच कारवाई करण्याच्या बैठकीत सुचना देण्यात आल्या असल्याची माहिती नागनोरे यांनी दिली.
हेही वाचा : “तुमच्या एकाही महाविद्यालयाला सावित्रीबाईंचं नाव का नाही?” मनोज जरांगे पाटील यांचा भुजबळांना थेट प्रश्न
महाबळेश्वर-पाचगणी दरम्यानच्या पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अशा २३७ चौरस किलोमीटर परिसर आहे. नैसर्गिक वरदान लाभलेल्या या परिसराचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी अनधिकृत बांधकामे होवू नयेत, यासाठी वेळीच कारवाई करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती महाबळेश्वर-पाचगणी इको सेन्सिटिव्ह झोन’च्या संनियंत्रण समितीच्या बैठकीत दिल्याची माहिती नागनोरे यांनी दिली.