अलिबाग : रोहा तालुक्यात इंदरदेव येथील धनगर वाडी येथील ४८ घरे वणव्यात जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. वणवा नेमका कसा लागला याचे कारण समजू शकलेले नाही. उन्हाळ्यात जंगलांना मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. यातील काही नैसर्गिक तर काही मानव निर्मित असतात. यामुळे जंगलातील वनसंपदेचे नुकसान होते. त्याचबरोबर आसपासच्या मानवी वस्तीलाही या वणव्यांची झळ बसते. रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील धनगर वाडीतील रहिवाश्यांना याचाच प्रत्यय आला.

वाडीवरील रहिवाशांना गुरुवारी सायंकाळी वणवा वाडीपरिसरात पसरल्याचे लक्षात आले. मात्र तोवर वणव्याने चहू बाजूने वाडीला वेढले होते. आगीवर निंयत्रण मिळवण्यासाठी तातडीने रोहा येथून अग्नीशमन दलाला तसेच एसव्हीआरएस बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. स्थानिक नागरीकही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत ४८ घरे जळून खाक नष्ट झाली.

वणवे लागण्या मागची कारणे कोणती?

स्थानिकांमध्ये असलेला गैरसमजातून हे वणवे लावले जातात. जंगलांना वणवे लावले की पुढील वर्षी जंगलात चांगले गवत उगवते. हे गवत जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणून दरवर्षी उन्हाळ्यात जंगलांना आगी लावल्या जातात. दुसरीकडे सरपणाला लाकूड मिळावे, म्हणूनही वणवे पेटवले जातात. वणव्यांमुळे झाडे सुकतात आणि पर्यायाने हे लाकूड सरपणासाठी तोडली जातात. कधी कधी शिकारीसाठीही हे वणवे लावले जातात. वणवा लागल्याने वन्यजीव आगीच्या विरुध्द दिशेने पळण्यास सुरूवात करतात. याच वेळी दबाधरून बसलेले शिकारी वन्यजीवांची सावज टिपतात. कोकणात खरीपाच्या कापणीनंतर पुर्नलागवडी आधी शेतात राब जाळण्याची प्रथा आहे. शेतातील राब जाळल्याने पुढील वर्षी पिक जोमाने येते असा समज शेतकऱ्यांमध्ये असतो. त्यामुळे शेतात राब पेटवले जातात. यामुळे बरेचदा अनियंत्रीत आग वणव्यांना जन्म देत असते.

आकडेवारी काय सांगते?

रायगड जिल्ह्य़ात ३५ हजार हेक्टर खासगी, तर १ लाख ७ हजार हेक्टर सरकारी वनक्षेत्र आहे. यात माथेरानसह फणसाड आणि कर्नाळा अभयारण्य परिसराचाही समावेश आहे. अत्यंत दुर्मीळ वन्य प्रजाती येथे वास्तव्य करतात. हिवाळ्य़ाच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरवातीला जंगलांना वणवे लागण्याचे प्रकार सुरू होतात. यामुळे वनसंपत्तीची मोठी हानी होते. २०१८-१९ मध्ये वणवे लागण्याच्या जिल्ह्यात २०७ घटना घडल्या. यात ८८७ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले. २०१९-२० मध्ये वणवे लागण्याच्या तब्बल १७४ घटना घडल्या. यात ५७१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले २०२०-२१ मध्ये डिसेंबर अखेर वणवे लागण्याच्या १३४ घटनांची नोंद झाली. यात ३०६ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील वनसंपदा बाधित झाली. २०२१-२२ मध्ये ३५५ वणवे लागले, ज्यात ७०३ हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले. तर २०२२-२३ मध्ये २१९ वणवे लागण्याच्या घटना समोर आल्या, ज्यात ६०२ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले.

वणव्याचे दुष्परिणाम कोणते ?

सातत्याने लावल्या जाणाऱ्या या आगींमुळे कोकणातील वनसंपदा अडचणीत आली आहे. वन्यजीवांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पशुपक्ष्यांचे हकनाक बळी जातात. सुरुवातीला जंगलापुरता मर्यादित असणारा हा प्रश्न आता आसपासच्या परिसरासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. अनियंत्रित वणवे आता जंगलालगतच्या गावात शिरण्याच्या घटना मागील काही वर्षात समोर आल्या आहेत. वणव्यांमुळे प्रदेशनिष्ठ वनस्पती धोक्यात येत आहे. यात प्रामुख्याने गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी जाती, पानफुटी, कलारगा झाडी, तेरडा, श्वेतांबरी, रानआले, सोनजाई, गजकर्णिका, रानकेळी, सापकांदा, टोपली कारवी, कुळी कापुरली संजीवनी, सर्पगंधा, अश्वगंधा यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. तर घुबड, चंडोल, रॉबिन रानकोंबडय़ा, मोर, सापांच्या प्रजाती गवतावरील कीटक, उंदीर, भेकरे यांसारख्या पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुर्वी मुबलक प्रमाणात आढळणारे वन्यजीव आता दिसेनासे होत चालले आहेत. कोकणात १८४ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही वणव्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत.

Story img Loader